कोल्हापूर: इचलकरंजीत कापड व्यापाऱ्याची सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, खिशात आढळली चिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 15:37 IST2022-10-29T15:37:20+5:302022-10-29T15:37:54+5:30
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कोल्हापूर: इचलकरंजीत कापड व्यापाऱ्याची सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, खिशात आढळली चिठ्ठी
इचलकरंजी : येथील पाटीलमळा-नारायण मळा परिसरातील अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन एका कापड व्यापार्याने आत्महत्या केली. ओमप्रकाश शंकरलाल शर्मा (वय ४२ रा. स्वामी अपार्टमेंट जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे. शर्मा यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, जवाहरनगर परिसरात राहणारे ओमप्रकाश हे कापड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते शनिवारी सकाळी ९ वाजता ते सांगली रोडवरील पाटीलमळा-नारायण मळा परिसरात असलेल्या प्रेमकमल रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये गेले होते. सात मजले असलेल्या अपार्टमेंटच्या गच्चीवर जावून त्यांनी थेट खाली उडी मारली. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मोठा आवाज झाल्याने अपार्टमेंटमधील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ माजली होती. या घटनेची माहिती समजताच गावभाग पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. तेथे नातेवाईकांनी व नागरिकांनी गर्दी केली होती. शर्मा यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. मात्र त्यामध्ये आत्महत्येचे कारण नाही.