Kolhapur: अंबाबाईचा हिंदोळा... रंगला नेत्रसुखद सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:42 IST2025-05-02T15:40:34+5:302025-05-02T15:42:43+5:30

कोल्हापूर : रणरणत्या उन्हाळ्यात थोडा थंडावा अनुभवावा, म्हणून अंबाबाई रानावनात गेली, तिथे झाडांच्या पारंब्या, वेली, फुलांनी बहरलेल्या हिरव्यागार झुल्यावर ...

A ceremonial puja was held for the festive idol of Ambabai Devi on Akshaya Tritiya | Kolhapur: अंबाबाईचा हिंदोळा... रंगला नेत्रसुखद सोहळा

Kolhapur: अंबाबाईचा हिंदोळा... रंगला नेत्रसुखद सोहळा

कोल्हापूर : रणरणत्या उन्हाळ्यात थोडा थंडावा अनुभवावा, म्हणून अंबाबाई रानावनात गेली, तिथे झाडांच्या पारंब्या, वेली, फुलांनी बहरलेल्या हिरव्यागार झुल्यावर निवांत बसून हळुवार झोके घेत आहे.. हे पुराणकथांमधून ऐकलेले, पौराणिक मालिकांमध्ये पाहिलेले दृश्य बुधवारी अक्षय्य तृतीयेनिमित्त कोल्हापूरकरांनी आणि परस्थ भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला. अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडप परिसरात देवीच्या उत्सवमूर्तीची ही सालंकृत मनोहारी पूजा बांधण्यात आली होती, तर मूळ मूर्तीची आंब्याच्या वनातील बैठी पूजा बांधण्यात आली. या निमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा आणि ज्याचा कधीही क्षय होत नाही, अशा अक्षय्य तृतीयेला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची दरवर्षी झोपाळ्यावर हिंदोळा घेत असलेल्या रूपात पूजा बांधली जाते. बुधवारी दुपारची आरती झाल्यानंतर देवीच्या मूळ मूर्तीची आंब्याच्या वनातील बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली. दुपारनंतर मंदिर परिसरातील गरुड मंडपात देवीच्या उत्सवमूर्तीची झोपाळ्यातील पूजा बांधण्यात आली.

यंदा गरुड मंडपाचे बांधकाम सुरू असल्याने त्या सदरेवर मांडव उभारण्यात आला. त्यानंतर, फुला-पानांनी, फळांनी सजलेल्या झुल्यावर देवीची पूजा बांधण्यात आली. यावेळी भाविकांना हरभऱ्याच्या डाळीची चटणी प्रसाद म्हणून दिली जाते. देवीची ही विशेष पूजा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. दुपारनंतर वाढत गेलेली गर्दी रात्रीपर्यंत कायम होती.

Web Title: A ceremonial puja was held for the festive idol of Ambabai Devi on Akshaya Tritiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.