कोल्हापुरात कारची दुचाकीला धडक, अपघातात पोलीस जखमी, कार चालक पसार

By संदीप आडनाईक | Updated: June 17, 2024 12:19 IST2024-06-17T12:18:39+5:302024-06-17T12:19:42+5:30

अपघातानंतर कारमधील एअरबॅग उघडल्या

A car collided with a two-wheeler in Kolhapur, police injured, the car driver escaped | कोल्हापुरात कारची दुचाकीला धडक, अपघातात पोलीस जखमी, कार चालक पसार

कोल्हापुरात कारची दुचाकीला धडक, अपघातात पोलीस जखमी, कार चालक पसार

कोल्हापूर : सर्किट हाउसजवळ रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार वासिम इसाक मुल्ला (वय २४, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कार चालकाने पलायन केले.

हा अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुल्ला हे ड्युटी करून दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी कसबा बावड्याकडून धैर्यप्रसाद मंगल कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या भरधाव चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते हवेत उडून बाजूला पडले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ तेथे धाव घेत त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. ही धडक इतकी जोरात होती, की चारचाकी गाडीतील एअरबॅग उघडल्या होत्या. त्यामुळे आतील प्रवासी बचावले.

चारचाकीमधून प्रवास करणारी आणखी एक व्यक्ती या अपघातात जखमी झाल्याचे आणि या अपघातानंतर कारचालक तेथून पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

Web Title: A car collided with a two-wheeler in Kolhapur, police injured, the car driver escaped