विवाह समारंभातील किरकोळ कारणावरून पै-पाहुण्यात तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 22:53 IST2023-05-05T22:53:41+5:302023-05-05T22:53:56+5:30

वादातूनच आज तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला.

A brawl between guests and guests due to a minor reason in the wedding ceremony | विवाह समारंभातील किरकोळ कारणावरून पै-पाहुण्यात तुंबळ हाणामारी

विवाह समारंभातील किरकोळ कारणावरून पै-पाहुण्यात तुंबळ हाणामारी

अमर मगदूम 
राशिवडे : मामा, भाचा आणि भाचे जावई यांच्यात शुक्रवारी राशिवडेतील गोठण परिसरात तुंबळ हाणामारी झाली.  विवाह स्थळासंदर्भात जावयाने विचारणा केल्याच्या व त्याला नको ते उत्तर दिल्याने बुधवारी वाद झाला होता. या वादातूनच आज तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला. यामध्ये एक मामा जखमी झाला असून त्यांच्यावर कोल्हापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या हाणामारीची चर्चा सोशल मीडिया व चौका चौकातून खुमासदारीने होत आहे

राशिवडे येथील मामाच्या मुलग्याचा विवाह समारंभ बुधवारी झाला. घराच्या दारातच सर्व कार्यक्रम पार पडले. मात्र विवाह स्थळ अन्यत्र ठेवले होते. याबाबत चौकशीसाठी सरवडेच्या भाचे जावयांनी मामेभाऊला फोन केला. त्यावेळी 'मरतुकीचे ठिकाण माणसं शोधून काढतात, तुला लग्नाचा पत्ता सापडत नाही व्हयं..?' असे उत्तर दिल्याने भाचे जावई अपमानित झाले. ही गोष्ट त्यांनी आपल्या मेहुण्याच्या कानावर घातली. याचा जाब भाच्याने मामाला लग्नाच्या जेवणावळीतच विचारला. त्यामुळे किरकोळ कारणाचा वाद वाढत गेला. यामधून एका मामाने भाच्याला कानशिलात मारली. ते भांडण सोडविताना भाचे जावयालाही प्रसाद मिळाला.

याचा राग मनात धरून भाचा व भाचे जावई यांनी शुक्रवारी दोन गाड्यातून आपले सहकारी मित्र आणून एका मामाची चांगलीच धुलाई केली. यामध्ये मामा जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत कोल्हापूरचे सरकारी रुग्णालय किंवा राधानगरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झालेला नाही.

Web Title: A brawl between guests and guests due to a minor reason in the wedding ceremony