कोल्हापुरात साकारली ३५ किलो चांदीची मूर्ती, मध्यप्रदेशमधील भाविकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:19 IST2025-08-11T15:18:53+5:302025-08-11T15:19:31+5:30
५१ इंच उंचीची लालबागचा राजा रुपातील मूर्ती

कोल्हापुरात साकारली ३५ किलो चांदीची मूर्ती, मध्यप्रदेशमधील भाविकांची मागणी
कोल्हापूर : कोल्हापुरात तब्बल ३५ किलो वजनाची चांदीची गणेशमूर्ती साकारली आहे. ५१ इंच उंचीची लालबागचा राजा रूपातील ही मूर्ती असून मध्यप्रदेश मधील एका भाविकांच्या मागणीनुसार तयार केली आहे, ही माहिती कृष्णा आर्ट्स वृद्धी सिल्व्हरचे जयेश ओसवाल, शैलेश ओसवाल, वैभव ओसवाल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
ओसवाल म्हणाले, कोल्हापूर हे कलानगरी म्हणून जगभर ओळखले जाते. सोने चांदीच्या सुबक आणि देखण्या दागिन्यांसह विविध वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात ३५ किलो वजनाची मूर्ती साकारली आहे. पंचवीस दिवसांत बावीस भाग जोडून ही मूर्ती साकारली आहे. कामगारांचे कौशल्य आणि कुशल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने येथे पोकळ मूर्ती तयार होतात.
ही मूर्ती साकारताना मोल्ड, डाय, आटणी, पास्टा, बेटकाम, कटिंग, जोडकाम, नक्षीकाम, फिनिशिंग, पांँलिश अशा विविध प्रकिया करण्यात आल्या. येत्या दोन दिवसांत ही मूर्ती मध्यप्रदेशला पाठविण्यात येणार आहे.