Kolhapur: स्वप्न पुर्ण झालं, थाटात दुकानाचे उद्घाटन केलं; दुसऱ्या दिवशीच मृत्यूने गाठले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:34 IST2025-10-25T17:33:28+5:302025-10-25T17:34:35+5:30
आंघोळ करत असताना ब्रेन स्ट्रोक आल्याचे निदान

Kolhapur: स्वप्न पुर्ण झालं, थाटात दुकानाचे उद्घाटन केलं; दुसऱ्या दिवशीच मृत्यूने गाठले
कोपार्डे : सोन्यावर कलाकारी करण्याची आवड. गुजरीत प्रशिक्षण घेऊन नवीन व्यवसायात भरारी घेण्याची स्वप्न पाहाणाऱ्या विशाल संजय आडनाईक (रा.खुपीरे) या अवघ्या २३ वर्षांच्या युवकाला बुधवारी सकाळी आंघोळ करत असताना ब्रेन स्ट्रोक आल्याने मृत्यू झाला. आदल्या दिवशी शुभारंभ केलेल्या सोन्याच्या दुकानात जाण्याच्या तयारीत असलेल्या विशालवर असा काळाने घाला घातल्याने संपूर्ण खुपीरे पंचक्रोशीत शोककळा पसरली.
विशालचे वडील संजय आडनाईक हे कुंभी कासारी साखर कारखान्यात कामगार प्रतिनिधी आहेत. ते नोकरीला जाण्यापूर्वी सोनार व्यवसाय करायचे. लहान असणाऱ्या विशालने नोकरीच्या शोधात वेळ न घालवता, सोनार व्यवसाय करण्याची वडिलांकडे इच्छा व्यक्त केली. वडिलांनीही त्याला सोनार कामाचे प्रशिक्षण घ्यायला मुभा दिली.
बुधवारी संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गावातील एका संस्थेच्या दुकान गाळ्यांत मोठ्या थाटात सोनार व्यवसायाचे उद्घाटन करण्यात आले. नातेवाईक, मित्रमंडळांनी विशालला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला. विशालचा आनंद गगनात मावत नव्हता.
गुरुवारी सकाळी आंघोळ करण्यासाठी तो बाथरूममध्ये गेला. आंघोळीसाठी दोन तांबे पाणी अंगावर ओतून घेताच, त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. बाथरूममध्ये तो धाडकन पडल्याचा आवाज आल्याने घरातल्यांनी धाव घेतली. त्याला उठताही येत नसल्याने ताबडतोब कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी आणि ऐन दिवाळीच्या सणात तरणाबांड मुलगा हरपल्याने आईवडिलांसह नातेवाइकांनी हंबरडा फोडला. विशालच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे.