कोल्हापुरातील रंकाळ्यात ८० वर्षांचे कासव मृत, मृत्यूच्या कारणावरुन चर्चेला ऊत

By संदीप आडनाईक | Updated: July 8, 2025 13:09 IST2025-07-08T13:08:40+5:302025-07-08T13:09:26+5:30

पर्यावरणतज्ज्ञांकडून अनेक कारणे

80 year old tortoise dies in Rankala Kolhapur, cause of death sparks debate | कोल्हापुरातील रंकाळ्यात ८० वर्षांचे कासव मृत, मृत्यूच्या कारणावरुन चर्चेला ऊत

कोल्हापुरातील रंकाळ्यात ८० वर्षांचे कासव मृत, मृत्यूच्या कारणावरुन चर्चेला ऊत

संदीप आडनाईक

कोल्हापूर : रंकाळ्यात वास्तव्य असलेल्या इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल या मऊ पाठीच्या वृद्ध कासवाचा बळी गेला. त्याचे वय ८० वर्षांपेक्षा अधिक असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचा अंदाज आहे. वृद्धावस्था, टिलापिया वनस्पती, प्रदूषित पाण्यामुळे तसेच मासेमारीच्या जाळीत अडकून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता अभ्यासक आणि पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली असली तरी वनविभागाने हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले आहे.

रंकाळा तलावात राजघाट समोर रविवारी रात्री दोन तरुणांना हे कासव तरंगताना दिसले. याला शास्त्रीय भाषेत Nilssonia gangetica असे म्हणतात. आययूसीएनच्या संकटग्रस्त यादीत याचा समावेश आहे. या कासवाला रंकाळा बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी पाण्यातून बाहेर काढले. या कासवाची लांबी तीन फूट आहे. त्याच्या तोंडाच्या भागाला तसेच अन्यत्र जखमा होत्या. 

काही अभ्यासकांच्या मते दोन ते तीन दिवसांपासून मासेमारीचा गळ तोंडाच्या भागात अडकल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला असावा. मासेमारीच्या जाळीपासून सुटका करण्याच्या प्रयत्नात तो काठाजवळ आला. दरम्यान, वनविभागाने पोस्टमार्टम केले. त्यात याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे वनविभागाने सांगितले. किमान सहा दिवस आधी याचा मृत्यू झाला होता. कुजल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव झाल्याचे सांगण्यात आले. मुडशिंगी येथील वनविभागाच्या नर्सरीत या कासवाला दफन करण्यात आले आहे.

रंकाळा तलाव मासे, कासव यांच्यासारख्या प्राण्यांसाठी आश्रयस्थान आहे ; पण गेल्या काही वर्षांत या तलावातील प्रदूषण वाढल्यामुळे या जलचरांचा मृत्यू होत आहे. अनेक कासवांचा यातील प्रदूषित पाण्यामुळेच मृत्यू झाला आहे. -संतपाल गंगनमाले, संशोधक, ठाकरे वाईल्ड लाइफ फाउंडेशन.
 

रंकाळ्याच्या प्रदूषित पाण्यात वाढणाऱ्या टिलापिया ही आक्रमक, जलद प्रजनन करणारी वनस्पती अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे कासवांना धोका असतो. टिलापियामध्ये कमी पोषणतत्त्वे आणि जास्त यूरिक आम्ल असते, त्यामुळे स्थानिक उभयचरांना संधिवात आणि सांधेदुखी होऊ शकते. यामुळे त्यांच्या हालचालींमध्ये अडचण येते, पोहता येत नाही. पृष्ठभागावर येऊन ते श्वास घेऊ शकत नाहीत. - यशोधन धनाजी जाधव, कासव अभ्यासक.

Web Title: 80 year old tortoise dies in Rankala Kolhapur, cause of death sparks debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.