तीन चोरट्यांकडून ८ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
By सचिन भोसले | Updated: October 14, 2022 20:09 IST2022-10-14T20:08:11+5:302022-10-14T20:09:20+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी मोटारसायकल चोरीप्रकरणी एकास, तर क्रेनच्या चोरीप्रकरणी दोन चोरट्यांना अटक केली आहे.

तीन चोरट्यांकडून ८ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
कोल्हापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी मोटारसायकल चोरीप्रकरणी एकास, तर क्रेनच्या चोरीप्रकरणी दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चौकशीत एक दुचाकी व दोन ठिकाणावरून क्रेनचे साहित्य असा ८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इजाज दिलावर शेख (रा. एम.एस.ई.बी ऑफीसजवळ, यादवनगर), सद्दामहुसेन मुक्तारआलम शेख (वय २४), मुक्तारआलम झाकीरहुसेन शेख (५३, दोघे रा. बाळुमामा मंदीराजवळ, एकता काॅलनी, माळवाडी, पुलाची शिरोली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे गोपनिय बातमीदाराकडून अंमलदार सुरेश पाटील यांना संशयित इजाज शेख हा चोरीची दुचाकी विकण्यासाठी सदरबाजारात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून एक मोपेड मिळून आली. आणखी चौकशी करता त्याच्याकडून सातारा येथून चोरलेली ७५ हजार किंमतीची मोपेड मिळून आली.
तपासादरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून क्रेन चोरून तो स्क्रॅप केली असून त्या क्रेनचे काही पार्ट शिरोली एमआयडीसीत गॅरेजमध्ये आहेत. अशी माहिती मिळाल्याने उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रणजित पाटील, असिफ कलायगर, प्रशांत कांबळे, विनोद कांबळे या पथकाने शिरोली एमआयडीसीतून सद्दामहुसेन शेख यांचे पोकलॅन गॅरेजवर जाऊन खात्री केली. त्यात गॅरेजवर क्रेनचे इंजिन, हायड्रोलिक मोटर, बुम सिलेंडर दोन नग, टायरसह ८ व्हील असे साहित्य मिळून आले. पंधरा दिवसांपूर्वी उद्यमनगरातून क्रेन चोरून तो स्क्रॅप केल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून सद्दामहुसेन शेख, मुक्तारअलम शेख यांना अटक केली. चोरीकरीता वापरलेले वाहन असे एकूण ७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.