राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील ७५ टक्के शेतकऱ्यांचे शक्तिपीठास समर्थन, आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:52 IST2025-07-14T11:52:05+5:302025-07-14T11:52:36+5:30

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्याच्या व राज्याच्या उन्नतीसाठीच आहे. शेतकरी बांधवांच्या भल्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठीच माझा खटाटोप ...

75 percent of farmers in Raju Shetty's constituency support Shakti Peethas, claims MLA Rajesh Kshirsagar | राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील ७५ टक्के शेतकऱ्यांचे शक्तिपीठास समर्थन, आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा

राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील ७५ टक्के शेतकऱ्यांचे शक्तिपीठास समर्थन, आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्याच्या व राज्याच्या उन्नतीसाठीच आहे. शेतकरी बांधवांच्या भल्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठीच माझा खटाटोप सुरू आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग समर्थन समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यातून ७५ टक्के शेतकऱ्यांनी शक्तिपीठास समर्थन दिले आहे. येणाऱ्या काळात १०० टक्के शेतकरी बांधव शक्तिपीठ महामार्गास समर्थन देतील, असा दावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रविवारी प्रसिद्धीपत्रकातून केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी क्षीरसागर यांच्यावर टीका करणारे पत्रक प्रसिद्धीला दिले. त्याला क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राजू शेट्टी यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. सन २०१९ च्या निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने माझी बदनामी करण्यासाठी हे आरोप केले होते; पण आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले. हे आरोप राजू शेट्टी यांनी सिद्ध करावेत; अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. 

वाचा- ढपल्यासाठी क्षीरसागर यांचा खटाटोप, राजू शेट्टी यांची टीका 

‘खोटं बोल पण रेटून बोल,’ हीच त्यांची प्रवृत्ती राहिली आहे. त्याचमुळे जिल्ह्यातील नागरिकांनी महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवली आहे. येणाऱ्या काळातही महाविकास आघाडीला जनता त्यांची जागा नक्कीच दाखवून देईल.

सध्या राजू शेट्टी यांच्याकडे कोणतेही काम शिल्लक नाही. शेतकरी बांधवांना फसवून त्यांनी कारखानदारांशी युती केली आहे. त्यामुळे त्यांना पैशांच्या गोष्टी दिसत आहेत. त्याचमुळे शेतकरी बांधवांनी ही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली हे गेल्या निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते.

विकासाला विरोध करून शेतकरी बांधवांची दिशाभूल करण्याचे काम राजू शेट्टी यांनी बंद करावे. अशा दिखाऊपणामुळे शेतकरी बांधव त्यांच्या पाठीशी राहिलेले नाहीत. याचे आत्मचिंतन त्यांनी करावे.

Web Title: 75 percent of farmers in Raju Shetty's constituency support Shakti Peethas, claims MLA Rajesh Kshirsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.