सहा महिन्यांत राज्यातील ६३६ लाचखोर लाचलुचपत'च्या जाळ्यात, कोल्हापुरातील १९ जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 16:40 IST2023-07-07T16:39:46+5:302023-07-07T16:40:29+5:30

महसूल आणि पोलिस विभागातील कर्मचारी लाच घेण्यात आघाडीवर

636 bribe-takers in the state in the net of Anti Corruption Bureau, 19 people from Kolhapur | सहा महिन्यांत राज्यातील ६३६ लाचखोर लाचलुचपत'च्या जाळ्यात, कोल्हापुरातील १९ जण

सहा महिन्यांत राज्यातील ६३६ लाचखोर लाचलुचपत'च्या जाळ्यात, कोल्हापुरातील १९ जण

कोल्हापूर : लाचखोरी रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असले तरी, लाचखोरांची वृत्ती काही कमी होताना दिसत नाही. गेल्या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात ४४८ कारवाया केल्या असून, ६३६ लाचखोरांना अटक केली. यात कोल्हापुरातील १९ लाचखोरांचा सहभाग आहे. नेहमीप्रमाणे महसूल आणि पोलिस विभागातील कर्मचारी लाच घेण्यात आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

लाच देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा असला तरी, प्रत्यक्षात मात्र शासकीय कार्यालयांमध्ये लाच दिल्याशिवाय एकही कागद हालत नाही, असे अनुभव नागरिकांना येतात. रितसर होणाऱ्या कामातही शासकीय कर्मचारी, अधिकारी त्रुटी काढून हात ओले करून घेतात. अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

या विभागाने जानेवारी २०२३ ते जून २०२३ अखेरपर्यंत राज्यात ४४८ ठिकाणी कारवाया करून ४५४ गुन्हे दाखल केले. यामध्ये ६३६ लाचखोरांना अटक केली. यात वर्ग एकच्या २५, तर वर्ग दोनच्या ७४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७४९ ठिकाणी सापळे रचून कारवाया केल्या होत्या यंदा पहिल्या सहा महिन्यांतच ४४८ कारवाया झाल्या आहेत. यावरून वाढत्या लाचखोरीचे प्रमाण लक्षात येते.

जिल्ह्यात १० कारवाया

गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात १० कारवायांमध्ये १९ लाचखोरांना अटक झाली. यात शिक्षण सहसंचालक हेमंत कठरे या वर्ग एकच्या अधिकाऱ्यासह वर्ग दोनच्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वर्ग तीनच्या नऊ कर्मचाऱ्यांसह तीन खासगी व्यक्तींचाही यात समावेश आहे.

विभागनिहाय प्रमुख लाचखोर

विभाग - कारवाया - आरोपी
महसूल - १११ - १५०
पोलिस - ७९ - १०९
पंचायत समिती - ४५ - ५९
महानगरपालिका - २३ - ३३
शिक्षण - २२ - ३५
वीज वितरण - २२ - २९
नगर परिषद - १३ - २४

पदाचा गैरवापर करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या लाचखोरांना अंकुश लावण्यासाठी तक्रारदारांनी तक्रारी देणे गरजेचे आहे. योग्य तक्रारींची पडताळणी करून दोषींवर तातडीने कारवाया केल्या जात आहेत. - सरदार नाळे - उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
 

Web Title: 636 bribe-takers in the state in the net of Anti Corruption Bureau, 19 people from Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.