नाबार्डचा झटका, तळ ठोकलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेतील ६३० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार

By राजाराम लोंढे | Updated: July 15, 2025 19:31 IST2025-07-15T19:30:27+5:302025-07-15T19:31:23+5:30

तीनपेक्षा अधिक वर्षे एकाच शाखेत काम केलेले चर्चेत

630 employees of Kolhapur District Bank who were stranded will be transferred | नाबार्डचा झटका, तळ ठोकलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेतील ६३० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार

नाबार्डचा झटका, तळ ठोकलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेतील ६३० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार

राजाराम लोंढे

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) अनेक शाखांमध्ये तीनपेक्षा अधिक वर्षे तळ ठोकून बसलेल्या सुमारे ६३० कर्मचाऱ्यांवर नाबार्डने हरकत घेतली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, संबंधितांना तालुक्यातील दोन व शेजारील तालुक्यात एक शाखा सुचवण्याचे आदेश बँक प्रशासनाने दिले आहेत.

कर्मचाऱ्यांना सर्व विभागांतील कामाचा अनुभव यावा, यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या दर तीन वर्षांनी होतात. एकाच ठिकाणी दीर्घकाळ काम केले तर मानसिकदृष्ट्या ते योग्यही नसते. मग, त्याठिकाणी हितसंबंध तयार होऊन त्याचा कामावर परिणामही होतो. त्यामुळे तीन वर्षांनी नवीन ठिकाणी बदली केली तर त्या कर्मचाऱ्याच्या कामाचा अनुभवही प्रत्येक तालुक्याला मिळतो. शासनाप्रमाणेच सहकारी बॅंकांमध्ये तीन वर्षांनी बदलीची प्रकिया राबविली जाते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मात्र चार, पाच, दहा वर्षे एकाच ठिकाणी अनेक कर्मचारी तळ ठोकून बसले आहेत. त्यांच्या बदल्या करण्याबाबत नाबार्डच्या प्रत्येक तपासणीत मुद्दा उपस्थित केला आहे. गेल्यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये बदल्यांचा विषय काढला, पण तोंडावर विधानसभा निवडणुका असल्याने तो पुन्हा बारगळला. यावर्षीच्या नाबार्ड तपासणीत पुन्हा हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर बँकेने बदल्यांचा निर्णय घेतला आहे.

म्हणजे अपहाराला बळ

बँकेत आतापर्यंत जे अपहार झालेत, ते कर्मचारी तीनपेक्षा अधिक वर्षे त्या शाखेत तळ ठोकून होते. अनेक वर्षे तिथेच काम केल्याने अनेकांशी हितसंबंध येतात व त्यातून चुकीचे काम करण्यास बळ मिळते.

शनिवारपर्यंत पसंतीच्या शाखा सुचवाव्या लागणार

संबंधित कर्मचाऱ्यांना शनिवार (दि. १९) पर्यंत तालुक्यातील दोन व शेजारील तालुक्यातील एक अशा तीन शाखा सुचवण्यास सांगितले आहे. तालुक्यात जागा शिल्लक नसेल तर दुसऱ्या शाखेत जावे लागणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया आहे. तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्यांना शाखा सुचवण्यास सांगितले आहे. त्यानंतर बदल्या करणार आहोत. - जी. एम. शिंदे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक)

Web Title: 630 employees of Kolhapur District Bank who were stranded will be transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.