कोल्हापूर जिल्ह्यात ६१ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव; संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त - विशेष पोलिस महानिरीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 11:48 IST2025-04-26T11:48:32+5:302025-04-26T11:48:59+5:30
कोल्हापूर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. परकीय नागरिकांसंदर्भात ...

कोल्हापूर जिल्ह्यात ६१ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव; संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त - विशेष पोलिस महानिरीक्षक
कोल्हापूर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. परकीय नागरिकांसंदर्भात केंद्र सरकारकडून आलेल्या निर्देशानुसार तत्काळ अंमलबजावणी केली जात आहे, ही माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
महानिरीक्षक फुलारी म्हणाले, पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्याच्या वरिष्ठ कार्यालयाला सूचना केल्या आहेत. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्वच पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महानिरीक्षकांच्या बैठका झाल्या आहेत. गुप्तचर विभाग, सायबर, दहशतवादविरोधी पथकाकडून खबरदारी घेतली जात आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण जिल्ह्यात सामाजिक शांतता राखण्यासाठी पोलिस योग्य ती खबरदारी घेत आहेत. काही संशयित परकीय नागरिक आढळल्यास त्याची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला देण्याचे आवाहनही केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना सूचना केल्या आहेत.
प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात ६१ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य आहे. दीर्घ मुदतीच्या व्हिसाच्या आधारे यांचे अधिकृतरीत्या वास्तव्य आहे. यामध्ये तीन मुस्लिम महिला तर उर्वरित हिंदूंचा समावेश आहे. उर्वरित ५८ नागरिक धर्माने हिंदू आहेत. या सर्वांची माहिती पोलिसांनी घेतली आहे. त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत. दर आठवड्याला संबंधित पोलिस स्टेशनकडून आढावा घेतला जात आहे.
दरम्यान, मुंबईतील पारपत्र कार्यालयातून या सर्वांना त्यांच्या व्हिसाची मुदत नूतनीकरणाचे काम करून घ्यावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सार्क सवलतीच्या व्हिसाची सवलत काढण्याचे आदेश दिले. त्याबाबत कोल्हापूर प्रशासनाकडे अद्याप कोणतेही लेखी आदेश आलेले नाहीत. त्याबाबतचे आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे ही सांगण्यात आले.
निष्क्रिय डीबी पथके यापूर्वीच बरखास्त
जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या घरफोडी, गंभीर चोरीच्या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे. मग शहरातील पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथक काय करते, या प्रश्नावर अधीक्षक खाटमोडे म्हणाले, ठराविक पोलिस ठाण्यातच गुन्हे शोधपथके आहेत. वेळोवेळी त्यांच्या कामाचा आढावा घेतला जातो. दाखल झालेल्या गुन्ह्याचा शोध किती वेळात लावला आहे, त्यासाठी सक्षम पुरावे आणि गोपनीय माहिती पथकाकडून घेतली जाते. निष्क्रिय असलेली पथके यापूर्वीच वरिष्ठांनी बरखास्त केली आहेत.