कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयाचे ५८ डॉक्टर्स, साहा. प्राध्यापक गुरुवारपासून बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:08+5:302021-07-21T04:18:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: गेले चार महिने पगारच न मिळालेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) ५८ डॉक्टर्स आणि साहाय्यक प्राध्यापकांनी ...

58 Doctors of Government Hospital, Kolhapur, Saha. Professor on indefinite strike from Thursday | कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयाचे ५८ डॉक्टर्स, साहा. प्राध्यापक गुरुवारपासून बेमुदत संपावर

कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयाचे ५८ डॉक्टर्स, साहा. प्राध्यापक गुरुवारपासून बेमुदत संपावर

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: गेले चार महिने पगारच न मिळालेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) ५८ डॉक्टर्स आणि साहाय्यक प्राध्यापकांनी गुरुवारपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याचा रुग्णसेवेवर मोठा परिणाम होऊ शकतो. दहा दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी सर्वांनाच लेखी निवेदन दिल्यानंतरही पगार जमा न झाल्याने त्यांनी कोरोना काळात आता हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे काम राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत पाहिले जाते. या महाविद्यालयाकडे ५८ डॉक्टर्स आणि साहाय्यक प्राध्यापक तात्पुरत्या पद्धतीने कार्यरत आहेत. कोरोना काळात या सर्वांनी मोठी कामगिरी करून दाखवली आहे. परंतु मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार महिन्यांचे वेतन या सर्वांना मिळालेले नाही. त्यामुळे घरखर्च चालवण्यापासून ते बँकांचे हप्ते भरण्यापर्यंत अनेक अडचणी या सर्वांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.

त्यामुळे बुधवारपर्यंत चार महिन्यांचा पगार जमा झाला नाही तर गुरुवारपासून हे सर्व जण बेमुदत संपावर जाणार आहेत. तसे लेखी पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांना दिले आहे. खरोखरच या सर्वांनी काम बंद केले तर सीपीआरच्या रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे.

-----------------------

कोल्हापुरातच अडचण

इतर वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन पीएए निधीतून केले जाते. मात्र, कोल्हापुरात या निधीतून वेतन देण्यास जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे हा पेच निर्माण झाला असून, या सर्वांचा चार महिन्यांचा पगार थकला आहे. जर अन्य जिल्ह्यांत ज्या पद्धतीने वेतन अदा केले जाते ती पद्धत कोल्हापुरातच कशी चुकीची ठरते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

-----------------------

..तर होणार गंभीर परिणाम

या ५८ डॉक्टर्सनी काम बंद केले तर रुग्णसेवेवर मोठा परिणाम होणार आहे. ज्यांनी शेकडाे हृदयशस्त्रक्रिया यशस्वी केल्या, ज्यांनी म्यूकरमाकोसिसच्या शेकडो रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या, अशा डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे केवळ चार महिने पगार नाही म्हणून काम बंद करण्याची वेळ आली तर त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत.

Web Title: 58 Doctors of Government Hospital, Kolhapur, Saha. Professor on indefinite strike from Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.