574 crore sanctioned for Sankeshwar to Amboli highway | संकेश्वर ते आंबोली महामार्गासाठी ५७४ कोटी मंजूर

संकेश्वर ते आंबोली महामार्गासाठी ५७४ कोटी मंजूर

ठळक मुद्देसंकेश्वर ते आंबोली महामार्गासाठी ५७४ कोटी मंजूर खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर : पुणे-बंगळूर आणि मुंबई -गोवा या महामार्गाला एकाच वेळी जोडणाऱ्या संकेश्वर ते बांदा या नव्या महामार्गाच्या बांधणीला पुन्हा एकदा गती येणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांना जोडून पर्यटन व व्यापाराची व्याप्ती वाढवणाऱ्या या रस्त्यातील संकेश्वर ते आंबोली या ६१ किलोमीटरपर्यंतच्या नव्या रस्त्यासाठी ५७४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. खासदार संजय मंडलीक यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा निधी दिला असून आंबोली ते बांदा या मार्गासाठी पुढील वर्षी निधी मिळणार आहे.

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. कोकणामध्येही पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. गोवा आणि कोकणात जाण्यासाठी आजरा - आंबोली मार्ग हा जवळचा मार्ग म्हणून वापरला जातो. सध्या या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ होत असून वाढती वाहतूक लक्षात घेता या संकेंश्वर ते बांदा या १०८ किलोमीटरच्या रस्त्याला महामार्गाला दर्जा देवून या रस्त्याचे दुहेरीकरण व्हावे अशी मागणी खासदार मंडलिक यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचेकडे केली होती.

पर्यटन, व्यापारासह उद्योग धंदा वाढीसह वेळेची बचत होणार असल्याने याला प्राधान्य द्यावे अशी विनंती केली होती. या नव्या महामार्गामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील दूध, फळे, भाजीपाला, उद्योगासाठी लागणारा कच्चा-पक्का माल हा रेड्डी पोर्टवरुन इतरत्र देशभर पाठविणे शक्य होणार असल्याचेही निदर्शनास आणून दिले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून हा निधी मंजूर झाला आहे.


असा असेल मार्ग

या मागणीतील पहिला टप्पा म्हणून संकेश्वर - गडहिंग्लज - कोवाडे - आजरा - गवसे - आंबोली ६१ किमी रस्त्याकरीता भू-संपादनासह रस्त्याच्या बांधणीचे काम हाती घेण्याचे ठरले आहे.

Web Title: 574 crore sanctioned for Sankeshwar to Amboli highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.