Kolhapur: राष्ट्रगीत अवमान; ५४ नगरसेवकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता, १९ वर्षे न्यायालयात मारले हेलपाटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:36 IST2025-12-24T15:33:36+5:302025-12-24T15:36:29+5:30
महापालिका सभेत घडला होता प्रकार : गांभीर्य आणून दिले लक्षात

Kolhapur: राष्ट्रगीत अवमान; ५४ नगरसेवकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता, १९ वर्षे न्यायालयात मारले हेलपाटे
कोल्हापूर : महापालिकेच्या सभागृहात झालेल्या राष्ट्रगीत अवमान आरोप प्रकरणी तत्कालीन ५६ नगरसेवकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता झाली. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी एम.एम. गादिया यांनी मंगळवारी (दि. २३) झालेल्या सुनावणीत हा निर्णय दिला.
मेजर संजय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर गेल्या १९ वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. इतकी वर्षे त्यांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागले. राष्ट्रगीत ही किती गंभीरपणे घेण्याची बाब आहे याचाच धडा त्यातून सर्वांना मिळाला.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहात २० फेब्रुवारी २००६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची तक्रार मेजर संजय शिंदे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार तत्कालीन ५४ नगरसेवकांवर खटला दाखल झाला होता. गेल्या १९ वर्षात दीडशेहून जास्त सुनावण्या झाल्या. महापालिकेच्या सभागृहातील बहुतांश नगरसेवक बदलले. त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला. दीर्घकाळ खटला सुरू असल्याने याच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा होत्या.
अखेर मंगळवारी झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी सबळ पुराव्यांअभावी सर्व नगरसेवकांना निर्दोष मुक्त केले. माजी नगरसेवकांनी या निर्णयाचे स्वागत केले. नगरसेवकांच्या वतीने ॲड. हर्षा खंडेलवाल, ॲड. गजानन कोरे, ॲड. के.पी. राणे, ॲड. पी.डी. सामंत, ॲड. व्ही.व्ही. पाटील यांनी काम पाहिले.
सुनावणीसाठी माजी नगरसेवक संजय पवार, उदय दुधाने, उदय जगताप, प्रकाश पाटील, राजू आवळे, सागर चव्हाण, राजू कसबेकर, रफिक मुल्ला, अशोक जाधव, तुकाराम तेरदाळकर, विजय साळोखे सरदार, सतीश घोरपडे, ईश्वर परमार, संभाजी देवणे, संजय चौगुले आदी उपस्थित होते.