शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून कोल्हापुरातील तरुणाला ४२ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:18 IST2025-03-04T16:17:34+5:302025-03-04T16:18:13+5:30
कोल्हापूर : शेअर मार्केटमधून दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील पिता-पुत्राने ...

शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून कोल्हापुरातील तरुणाला ४२ लाखांचा गंडा
कोल्हापूर : शेअर मार्केटमधून दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील पिता-पुत्राने फुलेवाडीच्या तरुणास ४१ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार जून ते ऑगस्ट २०२१ यादरम्यान घडला.
याबाबत केबल ऑपरेटर सचिन आनंदा पाटील (वय ४३, रा. चिंतामणी पार्क, फुलेवाडी) यांनी रविवारी (दि. २) रात्री जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वैभव कृष्णात पाटील (३५) आणि कृष्णात बापूसो पाटील (दोघे रा. पाडळी खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
फिर्यादी सचिन पाटील हे केबल ऑपरेटर आहेत. केबलच्या कामातून त्यांची कृष्णात पाटील याच्याशी ओळख झाली. त्याने मुलगा वैभव याच्याशी सचिन यांची ओळख करून दिली. या दोघांनी दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सचिन यांच्याकडून जून ते ऑगस्ट २०२१ या तीन महिन्यांत ४४ लाख ३५ हजार रुपये धनादेश आणि आरटीजीएसद्वारे घेतले.
तिसऱ्या महिन्यात परताव्याचे अडीच लाख रुपये दिले. त्यानंतर परताव्याचा एकही हप्ता आणि मुद्दल दिली नाही. वारंवार मागणी करूनही त्यांनी टाळाटाळ केल्याने अखेर सचिन यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रार अर्ज दिला. त्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.