ओव्हरलोड ट्रक, डंपर 'यमदूत', कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात ३८३ जण मृत
By उद्धव गोडसे | Updated: December 11, 2025 12:08 IST2025-12-11T12:08:11+5:302025-12-11T12:08:30+5:30
६१० जण जखमी : अपघातांमुळे अनेक कुटुंबे झाली उद्ध्वस्त

ओव्हरलोड ट्रक, डंपर 'यमदूत', कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात ३८३ जण मृत
उद्धव गोडसे
कोल्हापूर : ऊस, खडी, वाळू, बॉक्साईटची ओव्हरलोडिंग वाहतूक, वाहनांच्या नियमित दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष आणि चालकांच्या बेफिकीरीमुळे जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत आहे. अशा अनेक अपघातांमध्ये रोज वाहनचालकांसह निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात ५१८ अपघातांची नोंद झाली. त्यात ३८३ जणांनी जीव गमावाला, तर ६१० जण जखमी झाले. जीवघेण्या अपघातांमुळे जिल्ह्यातील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
जिल्ह्यात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. औद्योगिकीकरण, पर्यटन, व्यापाराचे केंद्र यामुळे आसपासच्या जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. पुणे-बंगळुरू, रत्नागिरी-नागपूर यासह कोकणात जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यांची स्थिती सुधारत असतानाही अपघातांची संख्या वाढत असल्याने याच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.
वाहनधारकांची ही बेफिकीरी..
अनेकदा अपघातानंतर पहिला दोष रस्त्यांना दिला जातो. ब्लॅक स्पॉटची दुुरुस्ती केली जात नाही, अशी ओरड केली जाते. मात्र, वाहतूक नियमांचे पालन करण्यापासून ते वाहनांची देखभाल दुरुस्ती करणे, इन्शूरन्स काढणे, स्वत:च्या बचावासाठी हेल्मेट वापरण्याचे मूलभूत नियम पाळले जात नाहीत. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकींग, सर्रास तिब्बल सीट बसवून प्रवास, मोबाईलवर बोलत किंवा कानात कॉड घालून वाहन चालविल्यामुळे गाडी चालवण्यातील गांभीर्य कमी होणे आदी कारणांमुळे वाहनचालकांची वाढती बेफिकीरीच जीवघेण्या अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष
बहुतांश अवजड वाहनांवरील चालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. वाहनांची देखभाल दुरुस्ती वेळेत केली जात नाही. ब्रेक, हेडलाईट, इन्शुरन्स, फिटनेस सर्टिफिकेट याकडे दुर्लक्ष होते. शहरात प्रवेश नसलेल्या मार्गांवरून वाहतूक केली जाते. जागा मिळेल तिथे वाहने उभी केली जातात. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते.
ओव्हरलोडिंगची गंभीर समस्या
जिल्ह्यात ऊस, वाळू, खडी आणि बॉक्साईटची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय धान्य, साखर, गूळ आणि उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक होते. ऊस आणि बॉक्साईटच्या ओव्हरलोडिंग वाहतुकीमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. त्यामुळे ओव्हरलोडिंग वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे.
अपघात - ५१८
मृत्यू - ३८३
जखमी - ६१०
ऊस वाहतुकीच्या वाहनांसाठी रिफ्लेक्टर बंधनकारक केले आहेत. ओव्हरलोडिंगबद्दल कारवाईची व्याप्ती वाढवली जाईल. सुरक्षित वाहतुकीसाठी वाहनधारकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. - संजीव भोर - प्रादेशिक परिवहन अधिकारी
अनेकदा अपघातांसाठी वाहनधारक आणि वाहनांमधील बिघाड कारणीभूत असतात. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. यासाठी वाहनधारकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. - नंदकुमार मोरे - वाहतूक पोलिस निरीक्षक
ओव्हरलोड वाहनांवरील कारवाया
- २०२४-२५
- केसेस - १७८३
- दंड - चार कोटी ६७ लाख आठ हजार
- एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर
- केसेस - १०९५
- दंड - दोन कोटी ९७ लाख सहा हजार