Kolhapur- बाळूमामांच्या खजिन्यावर डल्ला: देवालयाच्या ३३० कोटींच्या उत्पन्नात घोटाळा

By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 30, 2023 12:41 PM2023-10-30T12:41:26+5:302023-10-30T12:41:49+5:30

मेंढ्यांची विक्री, दानपेटीतील रकमेत गोलमाल

330 crore income scam of Balumama temple at Adamapur in Kolhapur | Kolhapur- बाळूमामांच्या खजिन्यावर डल्ला: देवालयाच्या ३३० कोटींच्या उत्पन्नात घोटाळा

Kolhapur- बाळूमामांच्या खजिन्यावर डल्ला: देवालयाच्या ३३० कोटींच्या उत्पन्नात घोटाळा

आदमापूर (ता. भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) येथील सद्गुरू बाळूमामांचे देवालय म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. खऱ्याला खरं म्हणून न्याय देणारे आणि खोट्याला खोटं म्हणून शिक्षा करणाऱ्या बाळूमामांचे नाव घेतले तरी श्रद्धेने हात जोडले जातात. अशा या पवित्र देवस्थानच्या ठिकाणी झालेल्या गैरव्यवहारावर धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने ताशेरे ओढून प्रशासकांची नियुक्ती केली आहे. भाविक श्रद्धेने देत असलेल्या दानातून सगळा व्यवहार चालतो; परंतु त्यावरच डल्ला मारण्याचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. धर्मादाय उपायुक्त कार्यालयाचा चौकशी अहवाल व प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन घेतलेल्या माहितीच्या आधारे देवस्थानमधील पदाधिकाऱ्यांचे कारनामे मांडणारी वृत्तमालिका आजपासून.. (वृतमालिकेत मांडलेल्या विषयांशी संबंधित कागदपत्रे लोकमतकडे उपलब्ध आहेत.)

इंदुमती गणेश

कोल्हापूर : आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू श्री बाळूमामा देवालयाच्या मेंढ्यांची विक्री व दानपेटीमधील ३३० कोटींहून अधिक रकमेचा हिशोब लागत नाही. देवालयावर प्रशासक आल्यानंतर पाच महिन्यांत ९ कोटी ६८ लाख ४५ हजार ५९५ इतके उत्पन्न मिळाले आहे. तो बेस पकडून किमान ९ कोटी उत्पन्न विचारात घेतले तरी मागच्या वीस वर्षांत ३३० कोटींच्या रकमेचे काय झाले याचा कोणताच हिशोब, नोंदी देवालयाकडे उपलब्ध नाहीत. धर्मादाय उपायुक्त कार्यालयानेही याबाबत गंभीर ताशेरे ओढले आहेत.

मंदिर, मेंढ्या, बग्यातील दानपेटी यांचे प्रशासक काळातील (एप्रिल ते ऑगस्ट २०२३) पाच महिन्यांचे एकूण उत्पन्न १३ कोटी व त्यातील फक्त बग्यांचे उत्पन्न साडेनऊ कोटी जमा झाले आहे. म्हणजे वर्षाचे २२ कोटी. पहिली दहा वर्षे भाविकांची संख्या कमी होती. त्यामुळे त्या काळातील सरासरी वार्षिक उत्पन्न ११ कोटी विचारात घेतले तरी दहा वर्षांचे ११० कोटी रुपये होतात. पुढील दहा वर्षांचे वर्षाला २२ कोटीप्रमाणे २२० कोटी असे ३३० कोटींचे उत्पन्न होते. परंतु, या उत्पन्नाच्या काहीच नोंदी नाहीत. त्याची कागदपत्रेही मिळत नाहीत.

बाळूमामांची ३० ते ३५ हजारांवर मेंढ्या आहेत. त्यांचे १८ बग्या (कळप) असून, एका बग्यात दीड ते दोन हजार मेंढ्या असतात. सोबत दोन ट्रॅक्टर, पाच ट्रॉली, एक जनरेटर, पाण्याचा टँकर, कारभारी, मेंडके, मदतनीस असतात. रथात बाळूमामांची मूर्ती असते. हे बग्गे महाराष्ट्रासह कर्नाटकातील गावागावांमध्ये फिरतात. तळाच्या ठिकाणी आरती, महाप्रसाद, कीर्तन होते. पंचक्रोशीतील हजारो माणसं दर्शन घेतात. देणगी, धान्य, बकरी, मेंढी देतात.

बकरी हे उत्पन्नाचे मोठे स्रोत असून, त्यातून कोट्यवधींचे उत्पन्न मिळते. पण त्याच्या नोंदी ट्रस्टकडे नाहीत, हाच सर्वांत मोठा गैरव्यवहार आहे. ट्रस्टने २००९ साली २० हजार मेंढ्यांची नोंद केली होती, त्यानंतरच्या पशुधनाची, बदलांची नोंद धर्मादायकडे केली नाही. बग्यातील ट्रॅक्टर, ट्रॉली, जनरेटर, टँकर या जंगम मालमत्तेची नोंद नाही. मेंढ्यांची परस्पर विक्री झाली असून, मोबदल्याची किरकोळ रक्कम ट्रस्टकडे जमा करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. अशा अनेक तक्रारींवर धर्मादाय कार्यालयाच्या अहवालामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

पोती भरून पैसे

प्रशासक आल्यानंतर बग्यातील दानपेटी व बकरी विक्रीतून पाच महिन्यांत ९ कोटी ६८ लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. यापूर्वी बगा निवाऱ्यासाठी थांबतात तेथे मुख्य देवालयाचे कर्मचारी जाऊन रक्कम पोत्यात ओतून आदमापुरात घेऊन यायचे. दानपेटीच्या पंचनाम्यावर दिनांक, दानपेटी व बग्गा नंबर, ठिकाण, तालुका, जिल्हा, वेळेची नोंद नाही. कोणती दानपेटी कोणत्या बग्याची आहे, कोणत्या बग्याची देणगी आली किंवा नाही याची नोंद नाही. पंचनाम्याच्या नोंदी अपूर्ण व चुकीच्या आहेत. ही बाब गंभीर असून, देवालयाचे नुकसान होत असल्याचा शेरा धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने दिला आहे. असाच शेरा मंदिरातील दानपेट्यांबाबतही आहे.

Web Title: 330 crore income scam of Balumama temple at Adamapur in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.