Kolhapur: शेंडा पार्कमधील शवागृहात एकाचवेळी ३० मृतदेह ठेवता येणार, मात्र, नातेवाईकांचा फेरा वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:20 IST2025-07-07T16:19:55+5:302025-07-07T16:20:16+5:30
प्रशस्त इमारत, अत्याधुनिक सुविधा; मृतदेह घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र शववाहिकेची व्यवस्था

Kolhapur: शेंडा पार्कमधील शवागृहात एकाचवेळी ३० मृतदेह ठेवता येणार, मात्र, नातेवाईकांचा फेरा वाढणार
कोल्हापूर : शेंडा पार्क येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन शवागृहाचा वापर सुरू झाला आहे. प्रशस्त इमारत आणि अत्याधुनिक सुविधांमुळे पोस्टमार्टम वेळेत होण्यासह एकाचवेळी तब्बल ३० मृतदेह शीतगृहात ठेवण्याची सोय या ठिकाणी झाली आहे. उपचार सीपीआरमध्ये आणि शवविच्छेदन शेंडा पार्कात होणार असल्याने नातेवाईकांचा फेरा वाढणार आहे.
सीपीआरमधील शवागृहाची दुरवस्था झाली होती. इमारतीची पडझड आणि शीतगृह नादुरुस्त झाल्याने तिथे काम करणाऱ्या डॉक्टरांसह मृतांच्या नातेवाइकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पोस्टमार्टमसाठी एकच बेड होता, त्यामुळे एकाचवेळी दोन-तीन मृतदेह आल्यास नातेवाइकांना ताटकळत थांबावे लागत होते. यावर उपाय म्हणून शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात शवागृहाची प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे.
नुकतेच या इमारतीचा वापर सुरू झाला आहे. एकाचवेळी पाच मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. तसेच, शीतगृहात ३० मृतदेह ठेवता येतात. यामुळे बेवारस मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेईपर्यंत पोलिसांना संबंधित मृतदेह शीतगृहात ठेवता येत आहेत. यापूर्वी सीपीआरमधील शीतगृहात केवळ दोन मृतदेह ठेवण्याची सोय होती. त्यामुळे पोलिस आणि नातेवाइकांना खासगी रुग्णालयांच्या शीतगृहात मृतदेह ठेवावे लागत होते.
विद्यार्थ्यांची सोय
वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोस्टमार्टम पाहण्याची व्यवस्था नवीन इमारतीत केली आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि बेडची संख्या वाढल्यामुळे कामकाज सुधारणार आहे.
स्वतंत्र शववाहिका
सीपीआरमधून शेंडा पार्क येथे मृतदेह घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र शववाहिकेची व्यवस्था केली आहे. ही शववाहिका सीपीआरच्या अपघात विभागासमोर असते. नातेवाइकांना खासगी शववाहिका बोलवण्याची गरज पडत नाही. मात्र, यापूर्वी सीपीआरमध्ये एकाच ठिकाणी होणाऱ्या कामासाठी आता शेंडा पार्कमध्ये फेरा मारावा लागत आहे. सीपीआर पोलिस चौकीतील पोलिसांना आता मृताची माहिती राजारामपुरी पोलिसांना कळवावी लागते. त्यानंतर पुढील कार्यवाही राजारामपुरी पोलिसांकडून केली जाते.