कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितींतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या शाळांमधील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे आज, मंगळवारपासून अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.या सहलींतर्गत विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा अनुभव घेता येणार असून, हे विद्यार्थी आज, मंगळवारी इस्रो अभ्यास सहलीसाठी विमानाने रवाना होणार आहेत. या अभ्यास सहलीमध्ये १३ मुले व १२ मुली असे एकूण २५ विद्यार्थी, दोन मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिका, एक अधिकारी व एक महिला डॉक्टर असा एकूण २९ जणांचा समावेश आहे.महानगरपालिकेच्या प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांना भेट देण्याची संधी दिली जाते. या उपक्रमासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात येते. असा उपक्रम सातत्याने राबवणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका असल्याचे उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांनी सांगितले.सहलीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून, विमान प्रवास, इस्रो येथील निवास व्यवस्था तसेच परतीच्या प्रवासाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी महानगरपालिका मुख्य इमारत चौकातून केएमटी बसद्वारे विद्यार्थ्यांना विमानतळावर रवाना करण्यात येणार आहे. यानिमित्त महापालिकेच्या चौकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ISRO: अभ्यास सहलीसाठी कोल्हापूर मनपा शाळेतील २५ विद्यार्थी आज निघाले ‘इस्रो’ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:39 IST