कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी २४१, तर पंचायत समितीसाठी ४५५ उमेदवार रिंगणात; प्रचाराला येणार जोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 15:17 IST2026-01-28T15:17:00+5:302026-01-28T15:17:24+5:30
बहुतांशी ठिकाणी तिरंगी लढती, जिल्हाभर चित्रविचित्र आघाड्या

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी २४१, तर पंचायत समितीसाठी ४५५ उमेदवार रिंगणात; प्रचाराला येणार जोर
कोल्हापूर : पावणेनऊ वर्षांनी होणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक इच्छूकांनी अगदीच गांभीर्याने घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी २४१, तर पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४५५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दोन्हीसाठी अनुक्रमे ४१८ आणि ७५८ जणांनी माघार घेतल्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, बहुतांशी ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. महायुतीमधील तीनही पक्ष राजकीय लढाईत एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे ठाकले आहेत. ५ फेब्रुवारीला मतदान होत असून, आता खऱ्या अर्थाने प्रचाराला जोर चढणार आहे.
बऱ्याच प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी युवा आणि मध्यमवयीन राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे. अशातच गेल्या काही वर्षांपासून राज्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, असे भक्कम दोन राजकीय पर्याय मिळाल्यानेही अनेकांनी या पक्षांची चिन्हे घेऊन रिंगणात उडी घेतली आहे.
पंधरा दिवसांपूर्वीची स्थिती पाहता महायुतीमध्ये कमीत कमी वांधे होतील, अशी स्थिती होती; परंतु युती झाल्यानंतर नाराज कार्यकर्ते आपसूक विरोधी पक्षांना मिळू नयेत आणि आपापला विधानसभा मतदारसंघातील गट टिकून राहावा यासाठी बहुतांश पक्षांनी आपापल्या सोयीनुसार आघाडी आणि युती केल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच राजकीय सोय म्हणूनही मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असून, मतदानाच्या दिवसापर्यंत पक्षांतर, पाठिंबा, सोडचिठ्ठीचे हे प्रकार सुरू राहण्याची शक्यता आहे.
- जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांची माघार ४१८
- पंचायत समित्यांसाठी उमेदवारांची माघार ७५८
- ६८ जागांसाठी रिंगणातील उमेदवार २४१
- पंचायत समित्यांसाठी रिंगणातील उमेदवार ४५५
तालुका - जिल्हा परिषद उमेदवार - पंचायत समिती उमेदवार
शाहूवाडी १३ / १९
पन्हाळा २७ / ४०
हातकणंगले ४१ / ७४
शिरोळ २४ / ४२
करवीर ४५ / ८१
गगनबावडा ५ / ८
राधानगरी २३ / ४६
कागल १६ / ३९
भुदरगड १० / २३
आजरा ८ / १८
गडहिंग्लज २० / ३९
चंदगड ९ / २६
एकूण २४१ / ४५५