कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन वर्षांत २०६ जणांचे मर्डर; रागाने बघितले, गँगवॉर, अनैतिक संबंधातून सर्वाधिक खून 

By उद्धव गोडसे | Updated: July 8, 2025 12:31 IST2025-07-08T12:31:12+5:302025-07-08T12:31:40+5:30

हल्ल्यात २६४ जण मरता-मरता वाचले: एलसीबीकडून बहुतांश गुन्ह्यांचा उलगडा

206 murders in Kolhapur district in three and a half years Most murders were committed out of anger, gang war, immoral relationships | कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन वर्षांत २०६ जणांचे मर्डर; रागाने बघितले, गँगवॉर, अनैतिक संबंधातून सर्वाधिक खून 

कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन वर्षांत २०६ जणांचे मर्डर; रागाने बघितले, गँगवॉर, अनैतिक संबंधातून सर्वाधिक खून 

उद्धव गोडसे

कोल्हापूर : कुणी रागाने बघितले म्हणून थेट समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घातला. कुणी गँगवॉरमधून पाळत ठेवून विरोधी टोळीतील तरुणाचा काटा काढला. कुणी गावात पाणी सोडताना झालेल्या किरकोळ वादातून तरुणाला संपवले, तर कुणी अनैतिक संबंधातून मित्राचाच खून केला. अगदी क्षुल्लक कारणातून जिल्ह्यात मुडदे पडत आहेत. गेल्या साडेतीन वर्षांत २०६ खून झाले, तर २६४ जणांच्या खुनाचा प्रयत्न झाला. किरकोळ कारणातून खुनाच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारांना कायद्याची भीती आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रागाने बघितल्याच्या कारणातून कुरुंदवाड येथील सिद्धार्थ चौकात अक्षय दीपक चव्हाण (वय २६, रा. मजरेवाडी, ता. शिरोळ) याचा तिघांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केला. गांधीनगर येथे दारू पिताना झालेल्या वादातून आशुतोष सुनील आवळे (२६, रा. गांधीनगर) याचा मित्रानेच खून केला. या दोन्ही घटना रविवारी (दि. ६) रात्री उशिरा घडल्या. या घटनांनी जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांची तीव्रता पुन्हा स्पष्ट केली आहे. किरकोळ वादातून थेट मुडदे पाडण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. गेल्या महिन्यात उचगाव येथे लिव्हइनमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीचा तरुणाने खून केला.

हातकणंगले तालुक्यातील आळते येथील मदरशातून सुटी मिळावी यासाठी अल्पवयीन मुलाने ११ वर्षीय विद्यार्थ्याचा अतिशय क्रूर पद्धतीने खून केला. आर्थिक वादातून मडिलगे (ता. आजरा) येथे पतीने पत्नीचा खून केला. हातकणंगले तालुक्यातील तमदलगे येथे सहा लाखांची सुपारी देऊन मोठ्या भावाने मद्यपी लहान भावाचा काटा काढला. कर्नाटकातील अथणी येथून आलेल्या टोळीने अनैतिक संबंधातून जोतिबा डोंगरावर एकाचा खून केला. अशा अनेक घटनांनी जिल्हा हादरला. पोलिसांनी तातडीने तपास करून सर्व खुनांचा उलगडा केला. आरोपींना अटकही झाली. मात्र, किरकोळ वादातून थेट खुनाच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याचे स्पष्ट होत आहे, तसेच वाढती गुन्हेगारी सामाजिक स्वास्थ्याला बाधक ठरत आहे.

खुनासोबत जीवघेणे हल्लेही गंभीर
वर्ष - खून - खुनाचा प्रयत्न
२०२२
- ५० - ५९
२०२३ - ५२ - ८६
२०२४ - ६८ - ६९
७ जुलै २०२५ पर्यंत - ३६ - ५०

एलसीबीने लावला छडा

जिल्ह्यातील बहुतांश गुन्ह्यांचा छडा लावण्याचे काम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजेच एलसीबीच्या पथकांनी केले आहे. खून करून सहा महिने लपलेले आरोपीही पोलिसांनी शोधून काढले. बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गँगवॉर, नशेबाजीचा परिणाम

शहरासह गांधीनगर, इचलकरंजी येथे गुन्हेगारांच्या टोळ्यांची दहशत वाढली आहे. वर्चस्ववादातून टोळ्यांध्ये संघर्ष वाढल्याने खून आणि खुनाचा प्रयत्न, मारामारीच्या घटना वाढत आहेत. गांजा, कोकेन, ड्रग्ज अशा अमली पदार्थांची विक्री वाढल्याने गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचे दिसत आहे.

Web Title: 206 murders in Kolhapur district in three and a half years Most murders were committed out of anger, gang war, immoral relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.