कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायतींसाठी शक्तिप्रदर्शनाने १८६७ अर्ज दाखल, आज छाननी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:51 IST2025-11-18T11:51:11+5:302025-11-18T11:51:50+5:30
Local Body Election: नगराध्यक्ष पदासाठी किती अर्ज दाखल...

कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायतींसाठी शक्तिप्रदर्शनाने १८६७ अर्ज दाखल, आज छाननी
कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतींसाठी अखेरच्या दिवशी सोमवारी सदस्यपदासाठी ६४१ इतक्या तर नगराध्यक्ष पदासाठी ७३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अखेरच्या दिवसापर्यंत २६३ सदस्यांसाठी १ हजार ८६७ इतक्या जणांनी तर १३ नगराध्यक्षांसाठी १६९ जणांनी अर्ज दाखल केले.
आज, मंगळवारी अर्जांची छाननी असून पात्र उमेदवारांना शुक्रवारी २१ तारखेपर्यंत माघार घेता येईल. जागांच्या तुलनेत दाखल झालेले अर्जांचे प्रमाण पाहता एका जागेसाठी सरासरी ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. गडहिंग्लज आणि हातकणंगले येथे नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक उमेदवारांनी अर्ज भरला आहे. एका नगराध्यक्षपदासाठी सरासरी १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील १० नगरपालिका व ३ नगरपंचायतींच्या निवडणुकीत सदस्यपदासाठी व अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात अर्ज दाखल होण्याचे प्रमाण कमी होते. पण, दिवस संपत आले तसे अर्जांची संख्यादेखील वाढली. सोमवारी तर अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता त्यामुळे इच्छुकांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरले. अर्ज भरण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ होती.
मात्र, त्या वेळेपर्यंत आलेल्या सर्व इच्छुकांचे अर्ज दाखल करून घेण बंधनकारक असल्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये हे काम सुरू होते. आज, मंगळवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांनी माघार घ्यावे यासाठी रस्सीखेच होणार आहे. शुक्रवारपर्यंत माघारीचा दिवस आहे. त्यामुळे या चार दिवसातच पात्र उमेदवारांना आपल्या जोडण्या लावून माघारीसाठी मनधरणी, ‘शब्द’ द्यावे लागणार आहेत. ---
अखेरच्या दिवशी आलेले अर्ज (कंसात एकूण अर्ज)
नगरपालिका : सदस्यपदासाठी अर्ज : अध्यक्षपदासाठी अर्ज
- जयसिंगपूर : ७८ (२०१) : ४ (१२)
- मुरगूड : ३१ (२२३) : ३ (१५)
- कागल : ६९ (२५७ ) : ३ (१५)
- शिरोळ : ३२ (११०) : ४ (९)
- गडहिंग्लज : ४९ (१४५) : १५ (२७)
- हुपरी : ६३ (१०५) : ८ (८)
- कुरुंदवाड : ८१ (१७३) : ७ (१५)
- पन्हाळा : २८ (८१) : १ (६)
- वडगाव : ३५ (७७) : ४ (९)
- मलकापूर : २६ (८४) : २ (६)
नगरपंचायत
- आजरा : ३६ (१३५) : ५ (१८)
- चंदगड : ३७ (१२५) : ८ (१६)
- हातकणंगले : ७६ (१५१) : ९ (१३)
- एकूण : ६४१ (१८६७) : ७३(१६९)
माघारीची मुदत : शुक्रवारी (दि. २१) पर्यंत
मतदान : २ डिसेंबरला
मतमोजणी : ३ डिसेंबरला
एकूण लोकसंख्या : २ लाख ८० हजार ७२०