संदीप आडनाईककोल्हापूर : सह्याद्रीमधील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात कायम बिबट्याचे वास्तव्य आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत प्रदेशनिष्ठ स्वरूप हे त्याचे वैशिष्ट्य आहे. कोल्हापूर वन्यजीव विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार ३५१.१६ चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेल्या राधानगरी अभयारण्य क्षेत्रात सुमारे १८ बिबट्यांची नोंद आहे.बिबटे दाट झाडीच्या प्रदेशात राहतात, शिवाय ते झाडावर जास्त वेळ घालवतात. बिबट्याला बिबळ्या किंवा वाघरू असेही म्हणतात. हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे, परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे. नर बिबट्याचे वजन ६० ते ७० किलो आणि मादी बिबट्याचे ३३-४० किलो इतके असते. बिबटे मनुष्यवस्तीजवळ राहणे जास्त पसंत करतात. तेथील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.सध्या दाजीपूरच्या अभयारण्यात १८ बिबट्यांचा वावर आहे, असे वन विभागाच्या वन्यजीव खात्याची आकडेवारी आहे. बिबट्याची कातडीसाठी तस्करी केली जाते. त्यासाठी त्याची शिकार केली जाते.बिबट्यांचा वावर वाढला..राज्य सरकारने राधानगरीसह राज्यातील आठ वनपट्ट्यांना संरक्षण दिल्यामुळे सह्याद्रीमधील बिबट्यांचा वावर सुरक्षित आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. दरवर्षीच्या प्राणीगणनेत कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट्यांची छायाचित्रे टिपली जातात. यामुळे हे जंगल जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे अधोरेखित होते. जंगल क्षेत्र नष्ट होत आहेत तसेच खाद्य न मिळाल्याने मानवीवस्तीजवळ बिबट्यांचा वावर वाढत आहे. मादी बिबटे हे ऊस शेतालाच जंगल समजून तिथेच प्रसूती करत आहेत, हे फार धोकादायक चित्र आहे.
संस्थानकाळात बिबट्याच्या नोंदी
कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज, त्यांच्यानंतर राजाराम महाराजांना शिकारीचा छंद जोपासला होता. त्याचे दस्तावेजही उपलब्ध आहेत. कोल्हापुरात बागल चौकात राहणारे दिवंगत स्वालेमहंमद निजाम चित्तेवान यांच्याकडे वन ट्वेन्टी फॉर्मेटमधील १९५२ च्या दशकातील या १६ मूळ निगेटिव्हजचा दुर्मीळ खजाना होता. लीलावती जाधव या कोल्हापूर संस्थानाच्या काळात वेगवेगळ्या शिकार मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या आणि जवळून पाहिलेल्या शेवटच्या व्यक्ती होत्या. त्यांच्या पुस्तकातूनही याविषयी प्रकाश पडतो.