Kolhapur News: शिकारीच्या उद्देशाने १७३ गावठी बॉम्ब जंगलात ठेवले, वनविभागाने जप्त केले; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:27 IST2025-12-11T12:27:22+5:302025-12-11T12:27:42+5:30
जंगलाच्या आतल्या भागात फिरताना दिसले

Kolhapur News: शिकारीच्या उद्देशाने १७३ गावठी बॉम्ब जंगलात ठेवले, वनविभागाने जप्त केले; दोघांना अटक
कडगाव : भुदरगड तालुक्यातील कडगाव वनपरिक्षेत्रातील म्हासरंग येथील जंगल परिसरात संशयास्पद हालचाली करत फिरणाऱ्या दिल बहादूर सिंग (वय ४६) रा.बिजवाडा हल्लीपिलकी कॅम्प सदाशिव पुरा सिमोगा कर्नाटक व राजाराम बापू देसाई (६५, रा. पाळ्याचा हुडा (ता. भुदरगड) या दोघांना वनपथकाने ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता १७३ गावठी जिवंत बॉम्बसह चाकू, कोयता मोबाइल हँडसेट वन विभागाने जप्त केले.
म्हासरंग येथील वन परिसरात गस्तीदरम्यान पथकाला हे दोघे जंगलाच्या आतल्या भागात फिरताना दिसले. थांबवून विचारपूस केल्यानंतर त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने तपासणी केली असता त्यांनी जंगलातील पायवाटेने ठिकठिकाणी गावठी बॉम्ब ठेवले असल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता मोठ्या प्रमाणावर स्फोटक सामग्री सापडली. प्राथमिक चौकशीत या स्फोटकांचा उपयोग जंगली प्राण्यांच्या अवैध शिकारीसाठी होणार असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या कारवाईनंतर पथकाने दोघांना तत्काळ अटक करून पुढील तपासासाठी वन विभागाच्या कार्यालयात हलवले. वनपरिसरातील बिबट्या, ससे, रानडुक्कर व अन्य वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाने मागील काही महिन्यांपासून विशेष मोहीम सुरू केली आहे.
अधिक तपास उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील व सहायक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडगाव वनक्षेत्रपाल राजेश चौगुले, वनपाल दत्तात्रय जाधव, वनरक्षक गणेश लोकरे, दत्ता होनमने, उमा पाटील, विजय शिंदे करत आहेत.