कोल्हापूर जिल्ह्यातील १४१ कंपन्यांचे सीएसआर फंडाचे ३२ कोटी रुपये मिळण्याची संधी, क्षेत्रनिहाय जमा झालेला निधी.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:53 IST2025-09-19T16:53:00+5:302025-09-19T16:53:25+5:30
नियम आणि अटींची पूर्ती करणाऱ्या सामाजिक संस्थांना निधी दिला जाणार

कोल्हापूर जिल्ह्यातील १४१ कंपन्यांचे सीएसआर फंडाचे ३२ कोटी रुपये मिळण्याची संधी, क्षेत्रनिहाय जमा झालेला निधी.. जाणून घ्या
कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध कंपन्यांकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडाच्या माध्यमातून २०२४-२५ या वर्षासाठी ३२ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम उपलब्ध झाली आहे. त्यातून विविध क्षेत्रासाठी हा निधी नियम आणि अटींची पूर्ती करणाऱ्या सामाजिक संस्थांना दिला जाणार आहे.
हा निधी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, कला-संस्कृती, खेळांना प्रोत्साहन आणि झोपडपट्टी विकास अशा आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये खर्च केला जाणार आहे. जिल्ह्यातील १४१ कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर निधीतून ही रक्कम दिली आहे. हा निधी कोणत्या क्षेत्रासाठी खर्च करावा, त्यासाठी प्रत्येक कंपनीने क्षेत्र निवडले आहे. इच्छुक संस्थांनी या निधी आणि प्रक्रियेची माहिती दिल्ली येथील नॅशनल सीएसआर डेव्हलपमेंट पोर्टल किंवा नॅशनल सीएसआर एक्सेंज पोर्टलवर मिळू शकते.
क्षेत्रनिहाय जमा झालेला निधी
- शिक्षण, अपंगत्व, उपजीविका : १८ कोटी ६३ लाख
- आरोग्य, उपासमार, कुपोषण, स्वच्छता व सुरक्षित पाणी : ८ कोटी १६ लाख
- पर्यावरण संवर्धन, प्राणी कल्याण : २ कोटी १२ लाख
- खेळांना प्रोत्साहन : १ कोटी ४ लाख
- महिला सक्षमीकरण, लिंग समानता : १ कोटी २ लाख
- वारसा कला, संस्कृती : ५३ लाख
- ग्रामीण विकास : ८४ लाख
- झोपडपट्टी विकास : १ लाख
या निधीसाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्यातून त्या सीएसआर फंडाशी जोडल्या जाऊन खऱ्या अर्थाने समाजहित साधतील. ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी निधी पोहोचला जाईल. - युवराज येडुरे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र एनजीओ समिती
जिल्ह्यातील ट्रस्टला सीएसआर फंडातून निधी कसा मिळतो, याची माहिती हवी. त्यासाठी काही संस्था मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. त्यांनी नाममात्र शुल्क घेऊन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना माहिती द्यावी किंवा जिल्हा प्रशासनाने त्याबाबतची जनजागृती करावी. - नितीन पाटील, संचालक, शिलेदार हायकर्स फाउंडेशन