'विदेशी'चा वाढला दर, मद्यपींच्या हातात देशी अन् बिअर!; गोवा बनावटीसह गावठी दारू रोखण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:58 IST2025-10-10T17:58:07+5:302025-10-10T17:58:24+5:30
देशी अन् बीअरच्या विक्रीत तेजी, लक्षणीय वाढ

संग्रहित छाया
कोल्हापूर : राज्य सरकारने विदेशी दारूच्या दरामध्ये ३० ते ५० टक्क्यांची वाढ केल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत विदेशी दारूच्या विक्रीत १४ टक्के घट झाली. बीअर आणि देशी दारूची दरवाढ कमी असल्याने त्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. विदेशीच्या दरवाढीमुळे गावठी आणि गोवामेड दारूची तस्करी वाढत आहे. तस्करी रोखण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे.
महसूल वाढीसाठी राज्य सरकारने जुलै २०२५पासून देशी आणि विदेशी दारूच्या विक्रीत दरवाढ केली. देशी दारूसह बीअरच्या दरात सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली, तर विस्की, रम, वाइन अशा विदेशी दारूच्या दरात सुमारे ३० ते ५० टक्क्यांची वाढ झाली.
दरवाढीनंतर पहिल्या तिमाहीत विदेशी दारूच्या विक्रीत १४ टक्क्यांची घट झाली. यामुळे राज्याला मिळणाऱ्या महसुलावर परिणाम होत आहे. दुसरीकडे बीअर आणि देशी दारूची दरवाढ मर्यादित असल्याने ग्राहकांनी याला पसंती दिली. बीअरच्या विक्रीत १७ टक्क्यांची वाढ झाली, तर देशीच्या विक्रीत सहा टक्क्यांची वाढ झाली.
गांधी सप्ताहात १५३ कारवाया
दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबरदरम्यान गांधी सप्ताहाच्या निमित्ताने दारू तस्करांच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. यात १५३ कारवाया करून १३२ जणांवर गुन्हे नोंद केले. ३० वाहनांसह ४५ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली.
नऊ महिन्यांत साडेपाच कोटींचा मुद्देमाल जप्त
जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात बेकायदेशीर दारू तस्करी, विक्री आणि निर्मितीचे २०२८ गुन्हे दाखल झाले. यात १९१७ आरोपींना अटक झाली, तर १५५ वाहने जप्त केली. दारू आणि वाहने असा पाच कोटी ६८ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल पथकांनी जप्त केला. यापैकी ११ गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने एक ते २५ हजारांपर्यंत दंडात्मक शिक्षा केल्या.
गोवा बनावटीच्या दारूचे ७६ गुन्हे
गेल्या नऊ महिन्यात जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर ७६ कारवाया झाल्या. यातील ८९ आरोपींना अटक करून ३० वाहने जप्त केली. सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गावठीचा धोका वाढला
देशी-विदेशी दारूचे दर वाढल्याने गावठी हातभट्टीच्या दारूची मागणी वाढत आहे. यामुळे गावठी दारूची छुपी निर्मिती, वाहतूक आणि विक्री वाढण्याचा धोका आहे. हा प्रकार रोखण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे.
गेल्या सहा महिन्यात १ कोटी ४० लाख लिटर दारू रिचवली
- देशी - ५२ लाख ३२ हजार लिटर
- विदेशी - ५० लाख ९७ हजार लिटर
- बीअर - ३७ लाख ३१ हजार लिटर