कोल्हापुरात वीटभट्टी, ऊसतोड कामगारांची १३६ मुले शिक्षणाच्या प्रवाहात, अवनिचा पुढाकार
By संदीप आडनाईक | Updated: February 8, 2025 17:08 IST2025-02-08T17:08:11+5:302025-02-08T17:08:45+5:30
मुलांना बालमजुरीतून मुक्त करण्याचा निर्धार

कोल्हापुरात वीटभट्टी, ऊसतोड कामगारांची १३६ मुले शिक्षणाच्या प्रवाहात, अवनिचा पुढाकार
संदीप आडनाईक
कोल्हापूर : बाल हक्क संरक्षण विषयात काम करणाऱ्या कोल्हापुरातील अवनि या संस्थेने पुढाकार घेतल्यामुळे यंदाच्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वीटभट्टी आणि ऊसतोड कामगारांची १३६ मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.
प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकारानुसार ७ ते १४ वयोगटांतील बालकांना प्राथमिक शाळेत दाखल केले जाते. अवनिने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील २३ कारखाना कार्यक्षेत्रात अशी ८०० ते १००० बालके शिक्षणापासून वंचित आढळली. स्थलांतरित विकास प्रकल्प आणि वीटभट्टी साखर शाळा उपक्रमांतर्गत अवनि फक्त ११ कारखान्यांपर्यंतच पोहोचली. संस्थेने २३-२४ या हंगामात वीटभट्टीवरील वाकरे, खुपिरे, दोनवडे, जाधववाडी येथील जिल्हा परिषदेच्या तसेच महानगरपालिकेच्या शाळेत ६४ बालकांना दाखल केले.
याशिवाय विद्यामंदिर कोरोची आणि कुडित्रे येथील श्रीराम हायस्कूलमध्ये ७२ ऊसतोड कामगारांच्या बालकांना प्रत्यक्ष दाखल करून त्यांना बालमजुरीतून मुक्त केले. त्यांना शैक्षणिक साहित्याचे तसेच स्कूल बॅगचेही वाटप केले. यासाठी साताप्पा मोहिते, अमर कांबळे, रवींद्र कुऱ्हाडे, वैशाली कांबळे, अंजली कांबळे, जयश्री कांबळे, शिल्पा भास्कर अश्विनी खोत आणि करूणा आठवले परिश्रम घेत आहेत.
ने-आण करण्याचीही स्वीकारली जबाबदारी
स्थलांतरित ठिकाणापासून शाळेचे अंतर दूर असल्याने संस्थेच्या प्रतिनिधी त्यांना रोज शाळेपर्यंत पोहोचवतात आणि शाळा सुटल्यानंतर त्यांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणतात.
- ६४ बालके वीटभट्टीवरील कामगारांची
- ७२ बालके ऊसतोड कामगारांची
- ४ ते ६ वयोगटांतील बालकांनाही शिक्षण
- ११ ठिकाणी डे केअर सेंटर सुरू
- १७८ बालके गिरवताहेत शिक्षणाचे धडे
खरंतर ३ ते ६ वयोगटांतील बालकांसाठी अंगणवाडीची जबाबदारी शासनाची आहे. मागणी करूनही याकडे दुर्लक्ष झाले, म्हणून अवनिने काही डे-केअर सेंटर सुरू केले. यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या मुख्याध्यापकांचे तसेच शिक्षकांचेही सहकार्य लाभत आहे. -अनुराधा भोसले, अध्यक्षा, अवनि संस्था.