Mahadevi Elephant: नांदणी येथे दगडफेकीत १२ पोलिस जखमी, सात वाहने फोडली; १२५ जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:39 IST2025-07-30T13:39:03+5:302025-07-30T13:39:43+5:30
आठ जणांना अटक; हत्ती मिरवणुकीतील प्रकार

Mahadevi Elephant: नांदणी येथे दगडफेकीत १२ पोलिस जखमी, सात वाहने फोडली; १२५ जणांवर गुन्हे दाखल
शिरोळ : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीणीचा राधे कृष्ण एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट, जामनगर (गुजरात) येथे हस्तांतरण करण्यासाठी सोमवारी (दि. २८) रात्री काढलेल्या मिरवणुकीदरम्यान मोठा गोंधळ झाला. हत्तीणीला रोखण्याचा प्रयत्न करत जमावाने पोलिस व त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत १२ पोलिस कर्मचारी जखमी झाले तर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी ३९ जणांची नावे निष्पन्न झाली असून, १०० ते १२५ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील आठ जणांना अटक करून मंगळवारी न्यायालयात उभे करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
वाचा: महादेवी हत्तीणीबाबत शेट्टींनी वनविभागाला लिहिलेलं 'ते पत्र व्हायरल; राजू शेट्टींनी केला खुलासा
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत नांदणी मठाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर सोमवारी सायंकाळी सन्मानाने हत्तीणीला पाठविण्यासाठी मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीदरम्यान नांदणीतील भरत बँक चौक ते दिगंबर जैन अतिशय क्षेत्र परिसरात दगडफेक सुरू केली. यामध्ये पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह १२ पोलिस कर्मचारी जखमी झाले, शिवाय सात शासकीय वाहनांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.
भूषण भरत मोगलाडे, रतन संजय चौगुले, अमन रिजवान सनदी, प्रतीक चवगोंडा समगे, आकाश गणपती मिरजकर, कुमार सिद्धू माने, कुलभूषण कुमार पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, उर्वरित स्वप्निल इंगळे, सुशांत शांतिनाथ धबाडे, नितांत शांतिनाथ धबाडे, संस्कार संजय पाटील, सूरज सुनील सावगावे, अक्षय महावीर माणगावे, नागेंद्र कल्लाप्पा माणगावे, वैभव भाऊसो माणगावे, अक्षय अनिल ऐनापुरे, चेतन अजित ऐनापुरे, रोहित राजेंद्र लाले,
भूषण गोपाळ ऊळागड्डे, सम्मेद लाले, प्रशांत कुगे, सौरभ जांगडे, राहुल सर्जेराव पाटील, प्रतीक महावीर मगदुम, वर्धमान मादनाईक, प्रथमेश महावीर मादनाईक, आदित्य मादनाईक, अनिकेत दीपक चौगुले, गोमटेश अजित मगदुम, प्रज्वल मगदुम, सम्मेद अजित पाटील, सक्षम धन्यकुमार पाटील, सुधीर पाटील, पार्श्व पाटील, सागर शंभुशेटे, डॉ. सागर पाटील, स्वस्तिक पाटील, दीपक कांबळे यांच्यासह १२५ जणांवर गुन्हे दाखल केले.
जखमी पोलिसांची नावे
पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलिस कर्मचारी बाबाचाँद मन्सूर पटेल, आनंदा कृष्णा दळवे, दीपक आनंदा जाधव, विकास नंदकुमार कांबळे, रविकिरण दिनकर पाटील, जुबेर खाजुद्दीन मुजावर, सुरज दादासो मोळे, स्वप्निल संभाजी पडवळ, प्रगती बाबासाहेब कांबळे, रामगोंडा पाटील व पोलिस कॉन्स्टेबल पाटील अशी पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
नांदणीत शांतता
दगडफेकीमुळे मिरवणुकीदरम्यान गोंधळ झाला. रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण वातावरण होते. दरम्यान, आज मंगळवारी गावामध्ये शांतता दिसून आली. मुख्य चौकात पोलिसांची दोन वाहने बंदोबस्तासाठी होती.