शेअरमधील गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाख ६० हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 11:45 IST2020-12-05T11:43:16+5:302020-12-05T11:45:40+5:30
fraud, Police, kolhapur शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवून शहरातील तिघांची ११ लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी एकास अटक केली.

शेअरमधील गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाख ६० हजारांची फसवणूक
कोल्हापूर : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवून शहरातील तिघांची ११ लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी एकास अटक केली.
पुष्कराज शरदचंद्र सावंत (रा. डफळे कॉलनी, उचगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत मोहन कृष्णाप्पा भंडारे (वय ६२, रा. क्रशर चौकजवळ, साने गुरुजी वसाहत) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी, संशयित सावंत हा शेअर बाजार गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करतो. त्याने १६ मार्च ते २५ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत शेअर बाजारामध्ये व म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळेल असे आमिष दाखविले.
त्याच्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी फिर्यादी भंडारे यांच्याकडून २ लाख १ हजार ५०० , साक्षीदार चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडून ४ लाख २९ हजार, तर सुनील अण्णासाहेब चव्हाण यांच्याकडून ५ लाख तीस हजार असे ११ लाख ६० हजार ५०० रुपये घेऊन फसवणूक केली.
फिर्यादी भंडारे यांच्यासह कुलकर्णी, चव्हाण यांनी सावंत याच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली. मात्र, सावंत त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तिघांनी शुक्रवारी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली.
त्यानुसार संशयित सावंत याच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सावंत याने आणखी कोणाची फसवणूक केले आहे का, याबाबत चौकशी पोलीस करीत आहेत.