Kolhapur: राधानगरी अभयारण्यात ११ पाणवठे प्राण्यांसाठी वरदान, वाघासह बिबट्यांचे अस्तित्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:59 IST2025-03-07T11:59:04+5:302025-03-07T11:59:58+5:30

नवीन पाच पाणवठे उभारणार

11 artificial water bodies built in Dajipur, Radhanagari Sanctuary are useful for wildlife in summer | Kolhapur: राधानगरी अभयारण्यात ११ पाणवठे प्राण्यांसाठी वरदान, वाघासह बिबट्यांचे अस्तित्व 

संग्रहित छाया

सागर चरापले

फुलेवाडी : दाजीपूर, राधानगरी अभयारण्यात बनविलेले ११ कृत्रिम पाणवठे उन्हाळ्यात वन्यजिवांसाठी उपयुक्त ठरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून उन्हाचा तडाका वाढल्याने वन्यजिवांना पाण्याची कमतरता जाणवत होती, यासाठी वन्यजीव विभागाने जंगलात बोअरवेल मारून केलेली पाण्याची व्यवस्था प्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे या प्राण्यांना त्यांच्या अधिवासातच पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे.

दाजीपूर अभयारण्यातील या अकरा पाणवठ्यात सुरुवातीला बोअर मारण्यात आले आहे. बोअरचे पाणी उपसण्यासाठी सोलर मोटर बसविली आहे. मोटर ऑटो असल्याने केव्हाही मोबाईलवरून चालू करण्यात येते. ते पाणी थेट पाणवठ्यामध्ये सोडले आहे. त्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत नाही.

पाणवठ्यांची संख्या जास्त असल्याने तेथे प्राण्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे पर्यटनासाठी दाजीपूर अभयारण्यात जाणाऱ्या पर्यटकांनाही वन्यजिवांचे दर्शन होत आहे. कोल्हापूर परिक्षेत्र वन्यजीव विभागाने पुन्हा पाच नवीन पाणवठ्यांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केला आहे. त्याला निधी मिळाल्यास हे नवे पाणवठे या वन्यजिवांची तहान भागविणार आहेत.

वन्यजिवांना अभय

दाजीपूर अभयारण्यात एक वाघ, २० बिबट, ३० रान कुत्री, अस्वले यांचा अधिवास आहे. गव्यांना या अभयारण्यात संरक्षण आहे. जंगलातील मानवी हस्तक्षेपामुळे अभयारण्यातील वन्यप्राणी बेधडक मानवी वस्तीत फिरत आहे.

वन्यजिवांच्या अधिवासानुसार पाणवठे तयार केले आहेत. त्यांना उन्हाळ्यात जंगलाबाहेर फार वणवण न करता पाणी मिळणार आहे. या पाणवठ्यांमुळे कॅमेऱ्याद्वारे वन्यजिवांच्या हालचाली टिपण्यासही मदत होत आहे. - श्रीकांत पवार, विभागीय वनाधिकारी, वन्यजीव.

Web Title: 11 artificial water bodies built in Dajipur, Radhanagari Sanctuary are useful for wildlife in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.