कोल्हापूर : भंगारवाला, दूधवाल्याच्या नावावर बोगस कंपन्यांची खरेदी-विक्रीची बिले सादर करून त्याद्वारे सुमारे १०० कोटी रुपयांची वस्तू व सेवा विक्री कर (जीएसटी) चोरी करणारा आरोपी साजिद अहमद शेख (वय ४६, रा. सोलापूर) याला केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने गुरुवारी अटक केली.
कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. गेल्या चार वर्षांपासून त्याने कर चोरी करून शासनाला गंडा घातल्याची माहिती गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली.
केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकारी अभिजीत भिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातील साजिद शेख याने ३० बनावट कंपन्या सुरू केल्या होत्या. त्याद्वारे तो सिमेंट आणि सळी खरेदी विक्रीचे कागदोपत्री व्यवहार दाखवत होता. त्याची बिले जीएसटी विभागाकडे सादर करून त्यावरील रिटर्न्स कराचा लाभ घेत होता.
प्रत्यक्षात वस्तूंची विक्री न करताच बनावट बिलांच्या आधारे कर चोरी केल्याचा संशय येताच केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी शेख याच्या सोलापुरातील कार्यालयावर छापा टाकला होता. एकाच दिवशी त्याच्या १२ कंपन्यांची चौकशी केली त्यात सुमारे ५० कोटीपर्यंत कर चोरी केल्याचे स्पष्ट झाले. इतर १८ कंपन्यांसह कर चोरीची रक्कम शंभर कोटींच्या वर पोहोचेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
शासनाची दिशाभूल करून कर चोरी केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी शेख याला नोटीस पाठवून कोल्हापुरात बोलवले होते. कोल्हापुरातील केंद्रीय जीएसटी कार्यालयात त्याला गुरुवारी अटक केले. जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. अधिकाऱ्यांनी त्याला कळंबा मध्यवर्ती कारागृहात पाठवले. वरिष्ठ गुप्तचर अधिकारी अभिजीत भिसे, गुप्तचर अधिकारी वरून सिंग, अतुल कुमार जैस्वाल यांनी कारवाई केली.
कॉम्प्युटर मोबाईल कागदपत्रे जप्त गुप्तचर अधिकाऱ्यांनी शेख याच्या सोलापुरातील कार्यालयात छापा टाकून कॉम्प्युटर, मोबाईल आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. यात बोगस कंपन्यांच्या खरेदी-विक्री व्यवहाराची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. यावरून या गुन्ह्याची व्याप्ती स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गरिबांच्या नावावर कंपन्याशेख याने भंगार विक्रेता, दूध विक्रेता, ट्रक चालक अशा व्यक्तींच्या नावे कंपन्या सुरू केल्याचे दाखवले आहे. त्यांच्या नावावर काढलेल्या बँक खात्याचा वापर शेख स्वतः करीत होता. यातील बारा जणांचे जबाब गुप्तचर अधिकाऱ्यांनी नोंदवले आहेत. उर्वरित अठरा जणांचे जबाब लवकरच नोंदवली जाणार आहेत.