युती धर्माविरुद्ध कोण वागत आहे? भाजपचे चव्हाण की शिंदेसेनेचे राणे?; कल्याण-डोंबिवलीत रंगला शिंदेसेना-भाजपमध्ये कलगीतुरा
By अनिकेत घमंडी | Updated: November 11, 2025 10:20 IST2025-11-11T10:20:26+5:302025-11-11T10:20:59+5:30
Local Body Election: महायुतीचा धर्म पहिल्यांदा कोणी तोडला, यावरून आता शिंदेसेना, भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीधर्माला तिलांजली दिल्याचे शिंदेसेनेचे म्हणणे आहे, तर सुरुवात कोकणातील शिंदेसेनेचे आ. नीलेश राणे यांनी केल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे.

युती धर्माविरुद्ध कोण वागत आहे? भाजपचे चव्हाण की शिंदेसेनेचे राणे?; कल्याण-डोंबिवलीत रंगला शिंदेसेना-भाजपमध्ये कलगीतुरा
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - महायुतीचा धर्म पहिल्यांदा कोणी तोडला, यावरून आता शिंदेसेना, भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीधर्माला तिलांजली दिल्याचे शिंदेसेनेचे म्हणणे आहे, तर सुरुवात कोकणातील शिंदेसेनेचे आ. नीलेश राणे यांनी केल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव वाढला आहे. कल्याण-डोंबिवलीत महायुती करू, असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या तोंडावर पत्रकारांना सांगितले होते. तरीही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी महायुती न करता स्वबळाचा नारा देत आपले नेतृत्व पक्षात सिद्ध करण्याचा निर्धार केल्याची चर्चा सुरू आहे.
चव्हाण यांनी रविवारी डोंबिवलीमध्ये बारा माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यामध्ये शिंदेसेनेचे कल्याण पूर्वेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक देवानंद गायकवाड तसेच, डोंबिवलीत योगेश म्हात्रे, पूजा म्हात्रे, पश्चिमेकडील शिंदेंचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश होता. ते प्रवेश होताच शिंदेसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी भाजपने युती धर्माला तिलांजली दिली, आता एकनाथ शिंदे यांनीसुद्धा संयम दाखवू नये, अशी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल केली. त्यानंतर बारा तासांत भाजपच्या प्रवेशाला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे नाराज माजी नगरसेवक विकास म्हात्रेंना सपत्नीक शिंदेसेनेत प्रवेश दिला.
कदम यांच्या टीकेचा समाचार घेताना चव्हाण म्हणाले, आ. नीलेश राणे शिंदेसेनेत आहेत. त्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांना शिंदेसेनेत प्रवेश दिला. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राणे यांना का रोखले नाही. अनेक जण भाजपमध्ये येण्याचा मुहूर्त बघत असून, त्यापैकी १२ माजी नगरसेवकांचा रविवारी प्रवेश झाला.
निधी न मिळाल्याने सोडचिठ्ठी : म्हात्रे
डोंबिवली : माझी कोणावरही नाराजी नाही. प्रभागात निधी न मिळाल्याने भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी काळात ९० कोटी रुपयांचा विकासनिधी देण्याचे आश्वासन दिले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून
प्रभागात विकासकामे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वबळाने चव्हाण यांचे नेतृत्व होणार भक्कम
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत दिवाळी कार्यक्रमात बोलताना कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदरमध्ये महायुती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. कल्याण-डोंबिवलीत भाजप हा शिंदेसेनेचा लहान भाऊ राहिला आहे. डोंबिवलीचे आ. चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. येथे महायुती करून लढल्याने भाजपची झाकली मूठ सव्वालाखाची राहील, असा विचार फडणवीस यांनी त्यावेळी केला असेल. मात्र, चव्हाण यांनी स्वबळावर महापालिका जिंकून आणली, तरच भविष्यात त्यांचे भाजपमधील नेतृत्व भक्कम होणार असल्याने चव्हाण यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा करून स्वबळाचा निर्धार केल्याची चर्चा आहे.
शिंदेसेनेचे आ. राजेश मोरे यांनी चव्हाण यांच्याशी युतीसंदर्भात मुंबईत चर्चा केली होती, मात्र चव्हाण यांनी पूर्वीसारखेच आधी निवडणूक स्वतंत्र लढू आणि निकालानंतर एकत्र येऊ, असे स्पष्ट केले. ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक तो मोठा भाऊ हे सूत्र स्वीकारण्यास शिंदेसेनेला भाग पाडले. कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी महापालिका निवडणूक वेगवेगळी लढणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांचे
मत आहे.
आता शिंदेसेनेचा भाजपवर पलटवार
ठाणे : कल्याण, डोंबिवलीत भाजपने शिंदेसेनेला धक्का देत दीपेश म्हात्रे यांच्यासह माजी नगरसेवकांचा रविवारी पक्षप्रवेश केल्यानंतर केडीएमसीतील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांना रविवारी रात्री शिंदेसेनेत प्रवेश देत शिंदेंनी वचपा काढला. शिंदेसेनेच्या वतीने ठाण्यात झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे, माजी नगरसेविका कविता म्हात्रे आणि माजी नगरसेवक नंदू धुळे-मालवणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
डोंबिवलीत रविवारी सकाळी भाजपने उद्धवसेनेचे दीपेश म्हात्रे यांचा पक्ष प्रवेश केला. दीपेश म्हात्रे हे शिंदे सेनेत जाणार होते. भाजपने त्यांना आपल्या गळाला लावले. यानंतर प्रत्युत्तरात करण्यात आलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते. शिवसेना एक कुटुंब आहे. शिवसेनेमध्ये कोणीही मालक किंवा नोकर नाही, असे त्यांनी सांगितले.