डोंबिवली - मागील ३ दिवसांपासून डोंबिवली शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. साचलेल्या पाण्याचा निचरा झाला असला तरी दिवसभर जनजीवन विस्कळीत होते. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे पूर्वेला डॉ राथ रस्त्यावर सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना स्काय वॉक शिवाय पर्याय नव्हता. सकाळपासून रस्त्यावरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आयरे गावात पाणी साचले होते, भोपरला काही चाळीत पाणी जमा झाले होते. शहरातील पावसाचा फटका खासदार श्रीकांत शिंदे यांनाही बसला.
श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यातही पाणी शिरले होते. त्यामुळे विकासकामांवर बोलायचं नाही असा टोला मनसेने लगावला. शिंदे यांच्या बंगल्यात गुडघाभर पाणी साचले होते. एमआयडीसीतील सुयोग हॉटेलजवळ हा बंगला आहे. सदगुरू बंगला असं त्याचे नाव आहे. या बंगल्यालगतच मोठा नाला असून याठिकाणी साफसफाई न झाल्याने परिसरातील नागरिकांसह श्रीकांत शिंदे यांनाही फटका बसला. डोंबिवलीतील या बंगल्यात श्रीकांत शिंदे कधी कधी येतात. बंगल्यातच पक्षाचे कार्यालयही आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकाही याच बंगल्यात होत असतात.
डोंबिवली पश्चिमेला देखील सखल भागात पाणी साचले होते, परंतु दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरले. नागरिकांच्या सोयीसाठी नुकताच तयार करण्यात आलेला मोठागाव-कोपर रस्ता स्वच्छ वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, याच रस्त्यावर सुमित कंपनीच्या माध्यमातून कृत्रिम डम्पिंग ग्राउंड उभारण्यात आले आहे. एका गाडीतून दुसऱ्या गाडीत कचरा ट्रान्सफर करताना मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर पडत असून इथल्या परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत. ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने तातडीने या ठेकेदारावर कडक कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी उद्धव सेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी मनपाकडे केली.