विशालचे बनावट फेसबुक अकाउंट; गुन्हा दाखल करा, माजी नगरसेवक गायकवाड यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:07 IST2024-12-30T13:06:45+5:302024-12-30T13:07:01+5:30
...दरम्यान, सूर्यवंशी यांनी केलेला खुलासा फेटाळत विशालचे बनावट फेसबुक अकाउंट बनविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गायकवाड यांनी रविवारी पोलिस ठाण्यात केली.

विशालचे बनावट फेसबुक अकाउंट; गुन्हा दाखल करा, माजी नगरसेवक गायकवाड यांची मागणी
कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा विशाल गवळी हा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे, असा आरोप माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला होता. मात्र हा आरोप फेटाळत भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी विशालच्या फेसबुक पेजवरील गायकवाड यांचा फोटो आणि त्यांच्या समर्थनार्थ टाकलेला मजकूर दाखवला होता. दरम्यान, सूर्यवंशी यांनी केलेला खुलासा फेटाळत विशालचे बनावट फेसबुक अकाउंट बनविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गायकवाड यांनी रविवारी पोलिस ठाण्यात केली.
नरेंद्र सूर्यवंशी यांनी शनिवारी गवळीचे फेसबुक पेज दाखवत त्यातील गायकवाड यांच्या फोटोमधील मजकूर हा त्यांच्या समर्थनार्थ असल्याचे दाखवले होते. दरम्यान, गवळीला वाचविण्यासाठी भाजप उद्योग करीत असून, गवळीचे बनावट फेसबुक अकाउंट बनविणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.
निकमांकडे हा खटला देऊ नका
- अल्पवयीन मुलगी अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा खटला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे देऊ नये.
- निकम हे भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणुकीत लढले होते. त्यामुळे ते गवळीला वाचविण्याचा प्रयत्न करतील. आपण राज्य सरकारकडे याबाबत मागणी करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
प्रतीकात्मक पुतळा लटकवून फाशी
नराधम विशाल गवळीचा प्रतीकात्मक पुतळा बनवून त्याला फाशी देत शिवाजी कॉलनी परिसरातील चौकात लटकवत नागरिकांनी अनोखे आंदोलन छेडले.
शनिश्वर मित्रमंडळ आणि अष्टविनायक सेवा मंडळ यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गवळीच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देत हत्येच्या घटनेचा निषेध केला.