Video: जीवघेणा प्रवास; मुंबईत प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 17:03 IST2026-02-01T17:03:09+5:302026-02-01T17:03:56+5:30
प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी, प्रवासी थेट पटरीवर...

Video: जीवघेणा प्रवास; मुंबईत प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न...
डोंबिवली: दररोज हजारो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. काहीजणांना बसायला जागा मिळते, तर काहीजणांना दाराबाहेर लटकून प्रवास करावा लागतो. मात्र, अशाप्रकारे प्रवास करणे जीवावर बेतू शकते. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ज्यात काही लोक प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेने जीव धोक्यात घालून रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी एक्स (X) वर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी, प्रवासी थेट पटरीवर...
लोकल येण्याआधीच फलाटावर प्रचंड गर्दी जमल्याचे व्हिडिओत दिसते. फलाटावरून लोकल पकडणे अशक्य झाल्याने काही प्रवासी थेट फलाटाच्या विरुद्ध बाजूला, पटरीवर उभे राहून जागा पकडण्याचा प्रयत्न करतात. धक्कादायक बाब म्हणजे, लोकल थांबण्याआधीच काही प्रवासी जीव धोक्यात घालून विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये चढताना दिसत आहेत. हा व्हिडिओ अत्यंत धोकादायक आणि अंगावर काटा आणणारा आहे.
मुंबई: प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी, प्रवासी थेट पटरीवर...प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न pic.twitter.com/pGNCOIL39t
— Lokmat (@lokmat) February 1, 2026
मुंब्रा अपघाताची आठवण; प्रशासनावर टीका...
भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी या व्हिडिओद्वारे एक वर्षांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघाताची आठवण करून दिली आहे. त्या घटनेत दोन लोकल एकमेकांच्या शेजारून जात असताना दरवाज्यात लटकणारे प्रवासी खाली पडून मोठा अपघात झाला होता. त्या दुर्घटनेची चौकशी झाली, मात्र वर्ष उलटूनही प्रवाशांच्या गर्दीचा प्रश्न कायम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

जीव धोक्यात घालणारा प्रवास...
मध्य रेल्वेचा प्रवास हा जीव घेणारा ठरत असल्याची वस्तुस्थिती आहे. सकाळ-संध्याकाळ लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या, डब्यांची संख्या वाढवली...तरीही प्रवासी संख्या जास्त आणि गाड्या कमी अशी स्थिती अजूनही कायम आहे.
गर्दी नियंत्रणाचे प्रयत्न अपुरे
प्रवासी अपघात टाळण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा प्रयोग करण्यात आला. विशेष गाड्यांची व्यवस्थाही करण्यात आली, मात्र या सर्व उपायांनंतरही प्रवाशांना दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागतो. वेळेवर कामावर पोहोचण्यासाठी अनेक प्रवासी जिथे थोडीशी जागा मिळेल तिथे उभे राहून धोकादायक प्रवास करताना दिसतात. अनेकदा या गर्दीमुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
स्वयंचलित दरवाज्यांची घोषणा, पण अंमलबजावणी दूर
महापालिका व नगरपरिषद निवडणुकांच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोप्रमाणेच मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा केली होती. मात्र या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे.
तोपर्यंत प्रवाशांचे काय?
या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रवासादरम्यान होणारे अपघात आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न...याबाबत रेल्वे प्रशासनाकडे सध्या ठोस उत्तर नाही, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. दिवा स्थानकातील हा जीवघेणा प्रवास दाखवणारा व्हिडिओ पोस्ट करून भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष वेधले आहे.