बदलापूर आंदोलनकर्त्यांचे खटले मोफत लढवण्यासाठी उल्हासनगर वकिलांची टीम सज्ज
By सदानंद नाईक | Updated: August 21, 2024 18:40 IST2024-08-21T18:35:07+5:302024-08-21T18:40:18+5:30
आंदोलनकर्त्यांनी वकिलांशी संपर्क साधण्याचे आवाहन अँड कल्पेश माने यांनी केलं आहे.

बदलापूर आंदोलनकर्त्यांचे खटले मोफत लढवण्यासाठी उल्हासनगर वकिलांची टीम सज्ज
उल्हासनगर : बदलापुरातील एका नामांकित शाळेसमोरील आंदोलनकर्त्यांचे खटले मोफत लढविण्यासाठी उल्हासनगरातील वकिलांची टीम सज्ज झाल्याची माहिती अँड कल्पेश माने यांनी दिली. आंदोलनकर्त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहनही माने यांनी केले.
बदलापूरच्या एका शाळेतील चिमुकल्यावरील अत्याचाराच्या निषेधार्थ शाळेसमोर संतप्त नागरिकांनी आंदोलन करून, काही आंदोलकांनी शाळेच्या साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी काही आंदोलकांवर बदलापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून त्यावरील खटले उल्हासनगर न्यायालयात चालणार आहे. या आंदोलनकर्त्यांची खटले मोफत चालविण्यासाठी वकिलांची टीम सज्ज झाल्याची माहिती अँड कल्पेश माने यांनी दिली. या वकील टीम मध्ये अँड उमेश केदार, अँड जय गायकवाड, अँड सत्येम पिल्ले, अँड राहुल बनकर, अँड प्रियेश जाधव आदी वकिलाचा सहभाग असणार असल्याची माहिती अँड माने यांनी दिली. तसेच रेल्वे प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्याचे खटले कल्याण रेल्वे कोर्टात सुरू राहणार आहेत. असेही माने म्हणाले.