बदलापुरातील ‘ती’ स्कूल बस आरटीओकडून जप्त; फिटनेस, विमा, परमिट संपल्याचे चाैकशीत उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:19 IST2026-03-01T05:18:46+5:302026-03-01T05:19:12+5:30
विनयभंगाची घटना घडलेल्या बसचे फिटनेस, विमा आणि परमिट संपल्याचे उघड झाले. त्यामुळे ही बस अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले.

बदलापुरातील ‘ती’ स्कूल बस आरटीओकडून जप्त; फिटनेस, विमा, परमिट संपल्याचे चाैकशीत उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : बदलापुरात चालकाने १२ वर्षीय विद्यार्थिनीचा बसमध्ये विनयभंग केला. चाैकशीदरम्यान आरटीओच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी बस जप्त केली.
विनयभंगाची घटना घडलेल्या बसचे फिटनेस, विमा आणि परमिट संपल्याचे उघड झाले. त्यामुळे ही बस अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. आरटीओने बेकायदा बसवर २० हजारांचा दंड लावला. आरसी रजिस्ट्रेशन रद्द करणार असून, आरोपी जयेश मुने याचे लायसन्स रद्द करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक चैतन्य बकरे यांनी दिली. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये आता अवैध स्कूल बस आणि स्कूल व्हॅनवर कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शाळा व्यवस्थापनाला पोलिसांचा इशारा
बदलापुरातील विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या घटनांसंदर्भात पोलिसांनी शहरातील सर्व शाळांची बैठक आयोजित केली होती. यावेळी स्कूल बस आणि शाळेच्या सुरक्षेबाबतच्या सूचना सर्व शाळांना दिल्या असून, त्याचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही, गाड्यांच्या चालक-मालकांचा पत्ता, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शालेय वाहनात महिला आणि पुरुष मदतनीस असणे गरजेचे आहे.
येत्या काही दिवसांत सर्व शाळांसह पूर्व प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापकांनी या गोष्टींची अंमलबजावणी करावी अशी सूचना पोलिस उपायुक्त सचिन गोरे आणि सहायकआयुक्त शैलेश काळे यांनी केली. बदलापूरच्या म्हात्रे विद्यालयात झालेल्या या बैठकीला १२० शाळांसह पूर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.