लायसन्सच्या कामासाठी येणाऱ्यांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 11:59 PM2020-12-17T23:59:37+5:302020-12-17T23:59:41+5:30

कल्याण आरटीओतील स्थिती; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा, सुविधांचीही वानवा

Those who come for license work are inconvenienced | लायसन्सच्या कामासाठी येणाऱ्यांची होतेय गैरसोय

लायसन्सच्या कामासाठी येणाऱ्यांची होतेय गैरसोय

Next

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : कोरोनामुळे कल्याण आरटीओचे कामकाज तीन महिने ठप्प होते. जूननंतर त्याला सुरुवात झाली खरी, परंतु सप्टेंबरपर्यंत कार्यालयात पुरेसे कर्मचारी येत नसल्याने कामात अडथळे आले. त्यानंतर शासन नियमानुसार कामाला सुरुवात झाली. तीन महिन्यांत ३३ हजारांहून अधिक अर्जदारांना लर्निंग लायसन्स दिल्याचा दावा उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी तानाजी चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात, पण सध्या तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
    कल्याण आरटीओमध्ये कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, टिटवाळा, मुरबाडपासूनचे नागरिक लर्निंग लायसन, पक्के लायसन्स, वाहननोंदणी व अन्य कामांसाठी येतात. मात्र, येथे नागरिकांना उभे राहायला शेड नाही. प्रचंड धूळ व अस्वच्छता 
आहे. पिण्याच्या पाण्याची सोय असून नसल्यासारखी आहे. प्रसाधनगृह व आसन व्यवस्था पुरेशी नाही. त्यामुळे नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे.
   लर्निंग लायसन्ससाठी येणाऱ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर टोकन क्रमांक मिळतो, पण त्यानुसार नंबर लागतोच असे नाही, अशी टीका काही त्रस्त नागरिकांनी केली. 
     दलालांचा विळखा ही समस्या या कार्यालयाला आहे. पण लर्निंग लायसन्सच्या ठिकाणी मात्र टोकन पद्धत व ठरावीक वेळ ठरवून देण्यात आल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जात असल्याचे दिसते.

नागरिक ताटकळतात
लर्निंग लायसन्ससाठी संगणकाद्वारे परीक्षा घेतली जाते. मात्र, परीक्षा हॉलमध्येही सुविधा नाहीत. केंद्राबाहेर नागरिक ताटकळतात. त्यात जर टोकन नंबर येऊन गेला तर मात्र पुन्हा वेळ, नंबर येण्यासाठी वाट बघावी लागते. दिवसाला सुमारे ५०० नागरिकांना टोकन देऊन लर्निंग लायसन्स दिले जाते. तर, महिन्याला सुमारे ११ हजार आणि विशेष कॅम्पद्वारे एक हजार लर्निंग लायसन्स दिल्याचे सांगण्यात आले.

खिडक्यांचा घोळ संपता संपत नाही
कल्याण आरटीओ कार्यालयास दलालांचा फारसा विळखा नसला तरी खिडक्यांचा घोळ संपत नाही. त्यामुळे नागरिकांना नेमके कोणत्या खिडकीवर जायचे, हे समजत नसल्याने गोंधळात आणखी भर पडत असल्याचे दिसून आले. वर्षानुवर्षे अशीच अवस्था असून, त्या कामात सुसूत्रता कधी येणार, असा सवाल करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

बिर्ला कॉलेजवळील आरटीओ कार्यालय अपुरे पडत आहे. आधारवाडी जेल परिसरातील नवीन जागेत नागरिकांसाठी शेड, आसन, पाणी व प्रसाधनगृहाची चांगली सुविधा असेल. अपुरे मनुष्यबळ असले तरी, सगळे झपाट्याने काम करत आहेत. 
    -तानाजी चव्हाण, आरटीओ अधिकारी

Web Title: Those who come for license work are inconvenienced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.