पादचाऱ्यांना बतावणी करीत लुटणारे दोघे भामटे गजाआड, चोरीचा मुद्देमालही हस्तगत
By प्रशांत माने | Updated: April 17, 2023 18:09 IST2023-04-17T18:08:44+5:302023-04-17T18:09:38+5:30
या भामट्यांना जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे.

पादचाऱ्यांना बतावणी करीत लुटणारे दोघे भामटे गजाआड, चोरीचा मुद्देमालही हस्तगत
डोंबिवलीः दिवसाढवळ्या गजबजलेल्या ठिकाणी संमोहित तसेच बोलण्यात गुंतवून भामट्यांकडून नागरिकांच्या अंगावरील दागिने हातचलाखीने लांबविल्याच्या तीन घटना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घडल्या होत्या. दरम्यान या भामट्यांना जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे.
सोनसाखळी चोरीच्या घटनांनी महिला वर्गात असुरक्षिततेची भावना असताना गजबजलेल्या रहदारीच्या ठिकाणी पुरुष तसेच वृद्ध देखील सुरक्षित नाहीत हे या घडलेल्या घटनांमधून समोर आले होते. साधारण ५० वर्षापुढील तसेच वृद्ध व्यक्तींना लक्ष केले जात होते. डोंबिवली पुर्वेकडील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ आणि ४ एप्रिलला अनुक्रमे हनुमंत गोसावी आणि अनिल तांबे यांना बोलण्यात गुंतवून तसेच संमोहित करीत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने दोघा भामट्यांकडून लांबविण्यात आले होते तर पश्चिमेला राजन खोत या वृद्ध व्यक्तीला लुबाडल्याची घटना ३ एप्रिललाच घडली होती.
याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान एकामागोमाग घडलेल्या गुन्हयांच्या तपासकामी स्थानिक पोलिस ठाण्यात विशेष पथक गठीत केले होते. दरम्यान रामनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणारे गुन्हे प्रकटीकरणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत भराडे, पोलिस हवालदार सुनिल भणगे, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे, रवींद्र कर्पे, विशाल वाघ, पोलिस नाईक हनुमंत कोळेकर, शिवाजी राठोड यांच्या पथकाला दोघा भामट्यांना सापळा लावून जेरबंद करण्यात करण्यात यश आले. मेहमुद अस्लम शेख (वय ४०) आणि आयुब ताज शेख (वय ५०) दोघेही राहणार मुंब्रा, जिल्हा ठाणे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
त्यांच्या अंगझडतीत रोकड, मोबाईल हॅंडसेट, गॉगल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २३,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांकडून रामनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दोन्ही गुन्हयातील १ लाख २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. विष्णुनगर पोलिस ठाण्यात घडलेल्या एका गुन्हयाप्रकरणी त्या दोघांना रामनगर पोलिसांनी विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.