देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 08:28 IST2025-09-30T08:22:55+5:302025-09-30T08:28:50+5:30
देवीच्या भंडाऱ्याला गेलेल्या आयुष कदम (१३) याचा २० फूट नाल्याच्या उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला.

देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
डोंबिवली : देवीच्या भंडाऱ्याला गेलेल्या आयुष कदम (१३) याचा २० फूट नाल्याच्या उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला. डोंबिवली पश्चिमेकडील सरोवरनगर परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. नाल्याच्या कामाच्या ठिकाणी चेंबर कोणी उघडे ठेवले? याचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली.
जगदंबा मंदिराकडून नवरात्रोत्सवात नऊ दिवस भंडारा दिला जातो. तेथील चाळीत राहणारा आयुष भंडाऱ्याला गेला होता. त्या परिसरात एमएमआरडीएच्या वतीने रिंगरूट मार्गाचे काम सुरू असून, या अंतर्गतच नाला बांधणीचे कामही सुरू आहे. नाल्यावरील चेंबरचे झाकण तुटलेले होते. भंडाऱ्यानिमित्त भांडी घासताना अन्न खरकटे नाल्याच्या पाण्यात टाकण्यासाठी झाकण सरकवले होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. रात्री उघड्या चेंबरचा अंदाज न आल्याने आयुषचा पाय घसरल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
२५ लाखांची आर्थिक मदत करा
मुलाच्या मृत्यूला एमएमआरडीए , कंत्राटदार व केडीएमसी जबाबदार असल्याचा आरोप उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला. कदम कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी म्हात्रेंनी केली. शिंदेसेनेचे उपशहरप्रमुख गोरखनाथ (बाळा) म्हात्रे यांनीही दोषींवर कारवाईची मागणी केली. ही बेफिकीर प्रशासनाने केलेली हत्या असल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा आहे.
२ तासांनंतर आयुषचा मृतदेह काढला बाहेर
आयुष नाल्यात पडल्याचे समजताच तातडीने परिसरातील तरुणांनी अग्निशमन विभागाला बोलावले. मात्र संबंधित विभागाने टॉर्चच्या मदतीने शोध घेण्यापलीकडे काहीही हालचाल केली नाही, असा आरोप रहिवाशांचा आहे. दरम्यान, परिसरात राहणाऱ्या वेदांत जाधवने खोल नाल्यात उडी मारली. तब्बल दोन तासांनंतर रात्री १२ ते साडेबाराच्या दरम्यान आयुषचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे ३०० फुटांवर सापडला.