दोघांनी बेंडकुळ्या काढल्या, एकदा वेगळे लढूनच बघू..!
By मुरलीधर भवार | Updated: October 26, 2025 08:02 IST2025-10-26T08:01:53+5:302025-10-26T08:02:12+5:30
दोन्हीकडे एकच मतप्रवाह, पक्षाची ताकद निवडणुकीत अजमावून पाहू

दोघांनी बेंडकुळ्या काढल्या, एकदा वेगळे लढूनच बघू..!
मुरलीधर भवार
कल्याण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी कल्याणमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असेल तरी स्थानिक पातळीवर दोघांनीही वेगवेगळे लढण्याची तीव्र इच्छाशक्ती असल्याचे चित्र आहे. आमच्या पक्षाची ताकद किती आहे. हे निवडणुकीत अजमावून पाहावे. तशी कार्यकर्त्यांची इच्छा असते, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे, तर भाजपचे नेते सतत शिंदेसेनेला डिवचत आहेत. त्यामुळे स्वतःहून युतीचे लोढणे गळ्यात का अडकवून घ्यायचे, असा शिंदेसेनेत मतप्रवाह आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा लाभमनसेला झाला तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो, त्यामुळे येथे महायुती करून लढणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. परंतु, स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्धार केला आहे. आता यावरून महायुती थोपवली जाणार की स्थानिक विरोधाचा आवाज ऐकला जाणार, याचे पदाधिकाऱ्यांसह कुतूहल कार्यकर्त्यांमध्येदेखील आहे.
असा आहे इतिहास
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसे वाढतो तेव्हा फटका भाजपला बसतो व मनसे घटतो तेव्हा भाजप मोठा होतो असा इतिहास. पण, दरवेळी असेच होईल असे कोणीही ठामपणे सांगत नाही. उलट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कल्याण-डोंबिवलीचे असताना येथेच पक्षाची ताकद वाढणार नसेल तर राज्यात काय संदेश जाईल, असे काही स्थानिक भाजप नेत्यांना वाटते, तर ठाकरे बंधूंची युती भाजपकरिता डोकेदुखी ठरू शकते, अशी भीती इच्छुक उमेदवारांना वाटते. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रवींद्र चव्हाण यांनी महायुतीत लढण्याचा निर्णय घेतला, तर तो मान्यच आहे. मात्र, भाजप कार्यकर्त्याची भावना स्वबळावर लढण्याची आहे.
महायुतीबाबत कल काय?
शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे म्हणाले की, महायुतीत लढण्याचा आम्ही नकार दिलेला नाही. मात्र, भाजपच्या छोट्या कार्यकर्त्यांपासून प्रदेशाध्यक्षांपर्यंत सर्व जण महायुतीत लढायचे नाही, असे सांगत आहेत.
दिवाळीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमध्ये शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकांसोबत फराळ घेतला. यावेळी त्यांनी महायुतीबाबतचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजपसोबत युती नको, असाच सूर होता. भाजप नको म्हणत असेल, तर आम्ही का युती करायची, असा सवाल शिंदेसेनेच्या गोटातून उपस्थित केला गेला.
महायुती केल्यास मनसुबे धुळीस मिळण्याची भीती
महापालिकेची निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने होत आहे. प्रत्येक ठिकाणी चार सदस्यांचा एक प्रभाग आहे. प्रत्येक पक्षाचे त्याठिकाणी अनेक इच्छुक आहेत.
त्यांनी गेल्या पाच वर्षापासून महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली. महायुतीत लढल्यास शिंदेसेना आणि भाजपमधील इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाईल व बंडखोरीची दाट शक्यता आहे.