कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 05:53 IST2025-07-03T05:52:46+5:302025-07-03T05:53:07+5:30
हर्ष हा कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहतो. त्याचे वडील संतोष हे पाणीपुरी विक्रीची हातगाडी लावतात. उच्च शिक्षण घेण्याचे हर्षचे स्वप्न होते.

कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
मुरलीधर भवार
कल्याण : अभ्यासासाठी भाड्याने घेतलेली दहा बाय दहाची खोली. त्यात पुरेसा प्रकाश नाही. पावसात घरात पाणी घरात साचू नये याकरिता ठिकठिकाणी लावलेले प्लास्टिक. खोलीत पुस्तकांचा, सोडविलेल्या प्रश्नपत्रिकांचा पसारा अशा कठीण परिस्थितीवर मात करीत कल्याणच्या पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाने ‘आयआयटी’पर्यंत मजल मारली. हर्ष संतोष गुप्ता याची उत्तराखंडातील रुरकी आयआयटीत निवड झाली.
हर्ष हा कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहतो. त्याचे वडील संतोष हे पाणीपुरी विक्रीची हातगाडी लावतात. उच्च शिक्षण घेण्याचे हर्षचे स्वप्न होते. कोरोनात लॉकडाऊन असताना ११ वी परीक्षेत तो नापास झाला. त्याची प्रकृतीही साथ देत नव्हती. त्याने जिद्द सोडली नाही. त्याने पुन्हा ११ वीची परीक्षा दिली. १२ वीनंतर त्याने जेईई मेन्समध्ये ९८.५९ टक्के गुण मिळविले. त्याची जेईई ॲडव्हान्सला निवड झाली; पण त्याने प्रवेश घेतला नाही. त्याला देशातील सर्वोत्तम कॉलेजात प्रवेश घ्यायचा होता. त्याने राजस्थान येथील मोशन एज्युकेशन कोटा येथून अभ्यास केला. त्याची उत्तराखंडातील रुरकी येथील आयआयटीमध्ये निवड झाली. त्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये भविष्य घडवायचे आहे.
मुलाच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न डोळ्यासमोर
हर्षचे वडील पाणीपुरी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. जमवलेल्या पुंजीतून त्यांनी मुलाच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले.
पाणीपुरीवाल्याचा मुलगा काय आयआयटीत प्रवेश घेणार? अशा शब्दात हर्षला त्याच्या वर्गातील मुले चिडवायची. त्याने आपल्या ध्येयावर लक्ष्य केंद्रित केले. आता तीच मुले हर्षचे अभिनंदन करीत आहे.
हर्षला त्याचे ध्येय गाठण्यात त्याचे शिक्षक नितीन विजय यांनी मार्गदर्शन केले. हर्षने १० ते १२ तास अभ्यास केला. कोचिंग आणि सेल्फ स्टडीवर भर दिला. त्यामुळे त्याला हे यश मिळाले. हर्षची आई गावी असते. हर्ष त्याचे वडील, दोन भाऊ आणि आजी सत्यभामा यांच्यासाेबत राहतो, असे त्यांच्या पालकांनी सांगितले.
दहा बाय दहाची खोली
हर्षची आई गावी असते. हर्ष त्याचे वडील, दोन भाऊ आणि आजी सत्यभामा यांच्यासाेबत राहतो. त्याने अभ्यासासाठी एकांत मिळावा, याकरिता दहा बाय दहाची खोली भाड्याने घेतली आहे. त्यात त्याने अभ्यास केला आहे.
मी पाणीपुरी विक्रेता असलाे तरी मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावू शकतो. पाणीपुरी विक्रीतून मिळणारे उत्पन्न फारसे नाही. तरी माझी जमापुंजी मोडून हर्षच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला. हर्षची आयआयटीत निवड झाली त्याचा आनंद खूप आहे. हर्ष सोबत मला माझी दोन मुले शुभम आणि शिवम
यांना देखील उच्च शिक्षण देऊन मोठे करायचे आहे.
संताेष गुप्ता, हर्षचे वडील