उल्हास नदीत बुडून सहा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 07:59 IST2025-03-15T07:59:05+5:302025-03-15T07:59:14+5:30
पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे पाण्यात बुडाले

उल्हास नदीत बुडून सहा जणांचा मृत्यू
बदलापूर : बदलापूरजवळील चामटोली गावातील पोद्दार संकुलातील दहावीच्या वर्गात शिकणारी चार मुले पोहण्यासाठी उल्हास नदी पात्रात गेली असता चौघांचाही बुडून शुक्रवारी मृत्यू झाला. वांगणी व उल्हासनगर येथील दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
धुळवड खेळून झाल्यानंतर आर्यन मेदर (१५), आर्यन सिंग (१६), सिद्धार्थ सिंग (१६), ओम तोमर (१५) हे विद्यार्थी अंघोळ करण्याकरिता नदीपात्रात उतरले होते. एक मुलगा बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी अन्य तिघे खोल पाण्यात उतरले आणि बुडून मरण पावले. पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडाले. रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.
वांगणीमध्येही मिलिंद झांजे (३१) या तरुणाचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाला. तर उल्हासनगर कॅम्प पाचमधील ११ वर्षांचा हर्ष चौहान हा मुलगा रंग काढायला वडिलांसोबत नदीवर आला होता. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला.