बदलापूरजवळच्या दगड खाणीला १९० कोटींचा दंड; मुंबई उच्च न्यायालयाचा खाण मालकाला दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:28 IST2025-07-16T09:28:38+5:302025-07-16T09:28:49+5:30
बदलापूरजवळच्या चामटोली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर ही दगड खाण आहे. या दगड खाणीमुळे चिंचवली आणि कोपऱ्याचीवाडी या आदिवासी गावातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते.

बदलापूरजवळच्या दगड खाणीला १९० कोटींचा दंड; मुंबई उच्च न्यायालयाचा खाण मालकाला दणका
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : बदलापूरजवळील चिंचवली आणि कोपऱ्याचीवाडी या दोन गावांजवळ असलेल्या दगड खाणीला १९० कोटींचा दंड ठोठावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. नियमांचे उल्लंघन आणि परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने न्यायालयाने दगड खाणीवर दंडात्मक कारवाई केली आहे. राज्यातील दगड खाणीला इतक्या मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बदलापूरजवळच्या चामटोली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर ही दगड खाण आहे. या दगड खाणीमुळे चिंचवली आणि कोपऱ्याचीवाडी या आदिवासी गावातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. सातत्याने होणारे वायू, ध्वनिप्रदूषण आणि खदानीतून निघणाऱ्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जमिनीही नापीक झाल्या आहेत. तसेच या भागातील पिण्याच्या पाण्याचे झरेही बंद झाले आहेत. ही दगड खाण बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊनही ती बंद होत नव्हती.
रॉयल्टी भरली नाही
परवानगी क्षेत्राच्या बाहेरील जागेत एक लाख ३० हजार ब्रास दगड खाणीचे उत्खनन केल्याने आणि त्याची रॉयल्टी न भरल्याने न्यायालयाने खाण मालकाला १९० कोटी ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीने त्याची अंमलबजावणी करावी, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता ही दगड खाण बंद होणार असल्याने गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले.
कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही
दुसरीकडे, दगड खाण मालकांनी आपली बाजू मांडली असून, इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आपली खाण नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच जो दंड लावला आहे त्यासंदर्भात आपण उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्याचेही स्पष्ट केले आहे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.