बेकायदा ६५ इमारतीतील रहिवाशांचे मुंबईत धरणे, पालिकेच्या पुन्हा नोटिसा; रहिवासी झाले हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 07:59 IST2025-07-15T07:58:58+5:302025-07-15T07:59:12+5:30

महापालिकेच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून बिल्डरांनी ६५ बेकायदा इमारती उभ्या केल्या आणि घरे विकली.

Residents of 65 illegal buildings protest in Mumbai, municipal corporation issues notices again; Residents are in distress | बेकायदा ६५ इमारतीतील रहिवाशांचे मुंबईत धरणे, पालिकेच्या पुन्हा नोटिसा; रहिवासी झाले हवालदिल

बेकायदा ६५ इमारतीतील रहिवाशांचे मुंबईत धरणे, पालिकेच्या पुन्हा नोटिसा; रहिवासी झाले हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीत ‘रेरा’ची फसवणूक करून उभ्या राहिलेल्या ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना महापालिका प्रशासनाने घरे रिकामी करण्याच्या नोटिसा पुन्हा पाठविल्या आहेत. या विरोधात दाद मागण्याकरिता रहिवासी १५ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत.

महापालिकेच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून बिल्डरांनी ६५ बेकायदा इमारती उभ्या केल्या आणि घरे विकली. महापालिकेची बनावट बांधकाम परवानगी तयार करून रेराकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले. वास्तूविशारद संदीप पाटील यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी उच्च न्यायालयाने महापालिकेस तीन महिन्यांच्या आत या इमारती पाडण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी ६५ बेकायदा इमारतीमधील नागरिकांना बेघर होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. याचिकाकर्ते पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने कायदेशीर नाेटीस बजावली. त्यामुळे पालिकेने पुन्हा रहिवाशांना नोटिसा बजावल्या.  

घरासाठी खर्च केली आयुष्याची जमापुंजी 
रहिवासी अर्चना बाणकर म्हणाल्या की, त्यांचे सासरे स्वातंत्र्यसेनानी आहेत. त्यांच्या आयुष्याची जमापुंजी घरासाठी लावली. आता तेच घर बेकायदा ठरविल्याने आम्ही जाणार कुठे ? आम्ही करायचे काय, असा सवाल त्यांनी केला.  
तर द्रौपदी हायईट्स या इमारतीत राहणारे भावेश शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. त्या पश्चात महापालिकेने पुन्हा आम्हाला घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

मुलीचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत
शिवलीला इमारतीत राहणारे दिनेश देवाडी म्हणाले की, माझी मुलगी इयत्ता पाचवीत शिकते. आम्ही बेघर झालो तर माझ्या मुलीचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत येणार आहे. 

संगीता नायर म्हणाल्या की, माझे पती हयात असताना त्यांनी कर्ज काढून घर विकत घेतले. इमारत बेकायदा असल्याचा धसका घेऊनच माझ्या पतींचे निधन झाले. मला घर रिकामे करण्याची नोटीस महापालिकेने पाठवली. माझे घर जाणार तर बँकेचे हप्ते मी कुठून भरू, असा माझ्यासमोर प्रश्न आहे.

Web Title: Residents of 65 illegal buildings protest in Mumbai, municipal corporation issues notices again; Residents are in distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.