कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 06:53 IST2025-11-24T06:52:52+5:302025-11-24T06:53:04+5:30
निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचे भूमिपूजन केले जात आहेत. पण नंतर पाणी मिळेल याचीही काळजी घ्या, असा टोला म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना चव्हाणांना लगावला.

कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
डोंबिवली : तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीमध्ये विश्वासाने मतदान करता, यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे, की जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे. दरम्यान, महायुतीऐवजी कमळाच्या चिन्हावर उभे राहणाऱ्यांना प्रदेशाध्यक्षांनी निवडून देण्याचे केलेले आवाहन पाहता त्यांनी केडीएमसीची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आ. रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश भोईर, सरोज भोईर यांच्या प्रभागाचा भाग असलेल्या डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील अनमोल नागरी ते साईनगर परिसरात १५० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्याचे काम होणार आहे. त्या कामाचा प्रारंभ रविवारी झाला. चव्हाण यांनी यावेळी भारत माता की जय आणि वंदेमातरम, भाजपचा विजय असो अशा घोषणा दिल्या. तसेच प्रकाश भोईरही लवकरच अशा घोषणा करतील, असेही चव्हाण म्हणाले. त्यामुळे भोईर लवकरच भाजपवासी होतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
निधी मागितला, पण दिला नाही : म्हात्रे
नगरसेवकाचे काम नगरसेवकांनी करायला हवे ही भावना माझी नेहमीच राहिली आहे. विकासासाठी निधी देणे हे माझे काम, परंतु बाकीचे काम काही नगरसेवकांकडून झाले नाही, असा आरोप चव्हाण यांनी या कार्यक्रमात माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्यावर त्यांचे नाव न घेता केला. याला म्हात्रेंनी प्रत्युत्तर दिले. निधी मागितला पण तो निधी दिला नाही, हे वास्तव आहे. निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचे भूमिपूजन केले जात आहेत. पण नंतर पाणी मिळेल याचीही काळजी घ्या, असा टोला म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना चव्हाणांना लगावला.
भोईर यांची हाताची घडी
रवींद्र चव्हाण यांच्या या विधानावर भाष्य करताना प्रकाश भोईर यांनी आतापर्यंत मी जे निर्णय घेतले आहेत, ते कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतले आहेत. यापुढील निर्णयही त्यांच्याशी चर्चा करूनच घेतले जातील, असे सांगत भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलणे टाळले.