कल्याणमध्ये रुग्णाच्या नातलगाने रिसेप्शनिस्टला केली मारहाण; आरोपीला रात्री उशिरा अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 11:56 IST2025-07-23T11:55:45+5:302025-07-23T11:56:52+5:30
तुम्ही जरा बाहेर थांबा, असे बोलल्याने रुग्णाच्या नातेवाइकाने रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे.

कल्याणमध्ये रुग्णाच्या नातलगाने रिसेप्शनिस्टला केली मारहाण; आरोपीला रात्री उशिरा अटक
डोंबिवली : तुमचा नंबर अजून आलेला नाही, डॉक्टर एमआरसोबत चर्चा करीत आहेत. तुम्ही जरा बाहेर थांबा, असे बोलल्याने रुग्णाच्या नातेवाइकाने रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्वेकडील नांदिवलीतील खासगी क्लिनिकमध्ये घडला. सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, मानपाडा पोलिस ठाण्यात गोकुळ झा याच्याविरोधात मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला रात्री उशिरा अटक झाली आहे.
संध्याकाळी या क्लिनिकमध्ये एक महिला बाळाला घेऊन आली होती. तिच्यासोबत आलेला झा हा डॉक्टर येताच केबिनमध्ये घुसू लागला. त्यावेळी रिसेप्शनिस्ट तरुणीने त्याला आत जाण्यास मनाई केली. याचा राग आल्याने गोकुळने तिला मारहाण केली.
आरोपीला तातडीने जेलमध्ये पाठवा!
एखाद्या महिलेला मग ती मराठी असो की उत्तर भारतीय, अशा पद्धतीने मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. मात्र, सध्या मराठी माणसांच्या बाबतीत ज्या घटना वारंवार घडत आहेत, त्या दुर्दैवी आहेत. सद्य:स्थितीमध्ये महाराष्ट्रात वातावरण दूषित झाले आहे. आरोपीला तातडीने अटक करून जेलमध्ये धाडले पाहिजे, अशी मागणी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली.
सखोल चौकशी करावी : चव्हाण
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आ. रविंद्र चव्हाण यांनी या प्रकरणी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. घटना निंदनीय असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. मराठी -अमराठी वादावर बोलताना चव्हाण यांनी घटना गंभीर असून कोणीही त्याचे राजकारण करु नये, असेही माध्यमांशी बोलताना सांगितले
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेतली. मराठी माणसासाठी आम्ही भांडतो, तेव्हा आम्हाला लगेच अटक करतात. मराठी माणसांना मारून पळ काढणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी एवढा वेळ का लागतो, असा सवाल त्यांनी केला.
गोकुळ झा हा फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करतो, असा आरोप शिंदेसेनेचे शहरप्रमुख नीलेश शिंदे यांनी केला. झा हा आधी उल्हासनगरमध्ये राहायचा काही दिवसांपूर्वीच तो कल्याण पूर्वेला रहायला आला होता. तो एका गंभीर गुन्ह्यातून आठ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता.
‘आरोपीला आमच्या ताब्यात द्या’
भाजपचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी आरोपीला आधी नागरिकांनीच चोप द्यायला हवा. महिलांशी कसे वर्तन केले पाहिजे, याची शिकवण आधी त्याला दिली पाहिजे. मगच पोलिसांच्या स्वाधीन केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली. परप्रांतीय लोकांकडून सध्या मराठी माणसांना अत्यंत घाणेरडी वागणूक मिळत आहे. जर हा आरोपी आमच्या ताब्यात मिळाला, तर त्याला सरळ करू, असा इशारा मनसेचे अरुण जांभळे, तसेच माजी नगरसेवक उल्हास भोईर यांनी दिला.