बोलण्याने झोपमोड होते म्हणून शेजाऱ्यावर हल्ला, चार जण जखमी; हल्ला करणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:51 IST2024-12-31T13:51:16+5:302024-12-31T13:51:48+5:30
याप्रकरणी हल्ला करणाऱ्या चेतन मांदळे या आरोपीला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. चेतन हा टिटवाळा येथे बँकेत कामाला आहे.

बोलण्याने झोपमोड होते म्हणून शेजाऱ्यावर हल्ला, चार जण जखमी; हल्ला करणारा अटकेत
कल्याण : चिकनघर परिसरात शेजाऱ्याच्या बोलण्याने झोपमोड होते, या कारणावरून एकाने शेजाऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात चौघे जखमी झाले. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या चेतन मांदळे या आरोपीला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. चेतन हा टिटवाळा येथे बँकेत कामाला आहे.
चिकनघर परिसरातील एका चाळीत मांदळे राहतो. त्याच्या शेजारी फैमुद्दीन अन्सारी यांचे कुटुंब आहे. अन्सारी यांची खोली दहा बाय दहाची आहे. त्यांच्या घरात जास्त माणसे राहतात. रात्रीच्या वेळी हे कुटुंब गप्पा मारत बसते. त्यांच्या गप्पा मारण्याच्या आवाजाने मांदळे यांची झोपमोड होते. या कारणावरून या दोन्ही शेजाऱ्यांमध्ये आधीपासून वाद होता. पुन्हा याच कारणावरून रविवारी रात्री वाद झाला.
यावेळी रागाच्या भरात मांदळे याने अन्सारी यांचे घर जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांच्या दारावर रॉकेल टाकले. त्यानंतर आग लावली. आगीत अन्सारी यांच्या दारावरील पडदा जळून खाक झाला. त्यानंतर मांदळे याने अन्सारी कुटुंबीयांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात चार जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.