माझी मुलगी विशालला ‘काका...काका’ म्हणायची; पीडितेच्या पित्याच्या शोकाकुल भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 09:51 IST2024-12-29T09:51:12+5:302024-12-29T09:51:35+5:30
मुलीची आई, आजी शोकाकुल आहेत. मुलीची अन्य तीन भावंडे ‘दीदी किधर गई’ असा प्रश्न विचारतात. त्यांना काय उत्तर देऊ, असा सवाल वडिलांनी केला. पीडित मुलीचे वडील हे गाडी चालक आहेत.

माझी मुलगी विशालला ‘काका...काका’ म्हणायची; पीडितेच्या पित्याच्या शोकाकुल भावना
कल्याण : माझी अल्पवयीन मुलगी आरोपी विशाल गवळीला ‘काका... काका...’ हाक मारायची. मुलीला विशालकडे पाठवू नका असे शेजाऱ्यापाजाऱ्यांनी सांगितल्याने मुलीला विशालकडे जाण्यापासून मी मज्जाव केला होता; पण ज्याला ती काका म्हणायची त्याने तिचा घात केला, अशा शब्दांत पीडित मुलीच्या पित्याने शोकाकुल अवस्थेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुलीची आई, आजी शोकाकुल आहेत. मुलीची अन्य तीन भावंडे ‘दीदी किधर गई’ असा प्रश्न विचारतात. त्यांना काय उत्तर देऊ, असा सवाल वडिलांनी केला. पीडित मुलीचे वडील हे गाडी चालक आहेत. गाडी चालविण्यातून त्यांना १८ हजार रुपये पगार मिळतो. या कमाईतून ते आई, पत्नी, चार मुलांचा सांभाळ करतात. पीडित मुलगी ही त्यांची मोठी मुलगी होती. ती विशालच्या घरी जायची. गणेशोत्सवात ती त्याच्या घरी गेली होती. शेजाऱ्यांनी सांगितले की, विशालचे चारित्र्य चांगले नाही. तुम्ही मुलीला तिकडे पाठवू नका. आम्ही तिला विशालच्या घरी जाऊ नकोस म्हणून बजावले होते. ती त्याच्या घरी गेल्याचे कळल्यावर मारहाण केली होती. त्यानंतर मुलगी त्याच्या घरी जात नव्हती, असे तिच्या पित्याने सांगितले.
मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
- पीडित मुलीच्या वडिलांना घेऊन आ. सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
- यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीडित मुलीच्या वडिलांना सांगितले, हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविले जाईल. आरोपीला फाशीची शिक्षा होईल. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाईल.
- पीडित मुलीच्या वडिलांना उद्धव सेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनीही आर्थिक मदत केली.
‘पुडीत काय आहे याची तिला कल्पना नव्हती’
- पीडित मुलगी विशालकडे गेली असता विशालच्या वडिलांनी त्या मुलीच्या हाती पुडी टेकवली व ती पुडी इमारतीखाली उभ्या असलेल्या व्यक्तीला देण्यास सांगितले.
- पीडित मुलीने ती पुडी त्या व्यक्तीला नेऊन दिली. मुलीला त्या पुडीत काय आहे याची कल्पना नव्हती, अशी माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली.